मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे 4 महिने बाकी आहेत. यंदाच्या मोसमाचं आयोजन हे भारतात करण्यात आलं आहे. या मोसमात लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) हे 2 संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या पर्वात आणखी रंगत पाहायला मिळणार आहे. दरम्यान याआधी लखनऊ फ्रँचायजी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बीसीसीआयला (BCCI) लखनऊ विरुद्ध तक्रार मिळाली आहे. याचा परिणाम हा मेगा ऑक्शन (Ipl Mega Auction 2022) आणि या पर्वावरही होऊ शकतो. यामुळे केएल राहुल (K L Rahul) आणि राशिद खान (Rashid Khan) या दिग्ग्जांना 15 व्या मुकावं लागू शकतं. (pbks and srh give complaint to bcci against to lucknow franchise over to conatct kl rahul and rashid khan)
तक्रार कोणाकडून आणि प्रकरण काय?
इनसाईड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या 2 फ्रँचायजीने लखनऊ विरुद्ध तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, लखनऊ आमच्या संघातील केएल राहुल आणि राशिद खान यांना आपल्या संघात सहभागी करुन घेण्यास आग्रही आहेत.
यासाठी या फ्रँचायजीकडून त्यांना संपर्क साधला जात आहे. ज्यामुळे आमच्या आगामी योजनांवर परिणाम होतोय, असं पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही फ्रँचायजींनी बीसीसीआयला तक्रार दिली आहे.
इनसाईडनुसार, बीसीसीआयला तोंडी तक्रार देण्यात आली आहे. आमच्या संघात घुसखोरी करुन खेळाडू फोडण्याचा मानस लखनऊचा आहे, असं या दोन्ही फ्रँचायजींनी म्हंटलं आहे.
आयपीएल ऑक्शनचे नियम हे बीसीसीआय ठरवते. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन्ही संघ सहभागी होत आहेत.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, दोन्ही संघांना ऑक्शनआधी मर्जीतील 2 खेळाडू खरेदी करु शकते. पण हे तेव्हाच करता येईल जेव्हा ट्रेडिंग विंडोला सुरुवात होईल. 1 डिसेंबरपासून ट्रेडिंग विंडोला सुरुवात होणार आहे. त्यानुसार यामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी काही जणांची निवड करावी लागेल.
आरोप सिद्ध झाल्यास कारवाई
रिपोर्टनुसार, बीसीसीआयला या प्रकरणी अद्याप लेखी स्वरुपात तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र बीसीसीआय या प्रकरणात लक्ष घालून आहे. तसंच यात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.
"आम्हाला अजून तक्रार मिळालेली नाही. मात्र 2 फ्रँचायजींकडून लखनऊ आमच्या संघातील खेळाडू फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी तोंडी तक्रार मिळाली आहे. आम्ही या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहोत. या प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. जेव्हा अशी जोरदार स्पर्धा असते, तेव्हा अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. दुर्लक्ष केल्यास इतर संघांवर अन्याय होईल", अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिराऱ्याने दिली.
केएल आणि राशिदची जाडेजासारखी स्थिती
लखनऊ फ्रँचायजीने पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि हैदराबादचा स्पिनर राशिद खान यांच्याशी संपर्क साधला. या दोघांना लखनऊमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात
आली, असा दावा करण्यात आलाय.
नियमांनुसार कोणताही खेळाडू 30 नोव्हेंबरपर्यंत इतर फ्रँचायजीसोबत संपर्क साधू शकत नाही. रिटेन्शन प्रकिया (खेळाडू कायम) पूर्ण झाल्यानंतरच ट्रेडिंग विंडोद्वारेच फ्रँचायजी खेळाडूंना आपल्या संघात सहभागी करु शकते.
प्रत्येक आयपीएलच्या मोसमाआधी सर्व फ्रँचायजीस कोणत्या खेळाडूंना कायम राखणार आहेत, याची यादी एका ठराविक तारखेपर्यंत बीसीसीआयला द्यावी लागते. यासाठी यावेळेस बीसीसीआयने 30 नोव्हेंबर ही तारीख ठरवली आहे. ही यादी आल्यानंतर ज्या खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे, त्या खेळाडूंवर ट्रेडिंग विंडोत बोली लावली जाते.
काही वर्षांपूर्वी 2010 मध्ये असाच प्रकार समोर आला होता. तेव्हा रवींद्र जाडेजा हा राजस्थान रॉयल्सचा भाग होता. तेव्हा जाडेजाने दुसऱ्या फ्रँचायजीसह संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे बीसीसीआयने तिसऱ्या मोसमासाठी जाडेजाला निलंबित करण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब आणि हैदराबाद या फ्रँचायजींनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळलं, तर केएल राहुल आणि राशिद खान या दोघांनाही या 15 व्या मोसमासाठी निलंबित केलं जाऊ शकतं.
दरम्यान रिपोर्टनुसार केएलने पंजाबकडून खेळण्यास नकार दिला होता. तर राशिदने माझ्यासाठी सर्वाधिक पैसे मोजले तरच, मी हैदराबादसह राहेन, अशी अट त्याने ठेवली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढं काय होणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.