मुंबई : आयपीएलच्या 13 व्या सीजनमधून विवो कंपनीला हटवल्यानंतर आयपीएल लीगसाठी नवीन प्रायोजकांसाठी जागा मोकळी झाली आहे. त्यामुळे योगगुरू बाबा रामदेव यांची आयुर्वेद कंपनी पतंजली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या सीजनच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बोली लावण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी पीटीआयला सांगितले की, 'आम्ही यावर विचार करीत आहोत. हे स्थानिकांसाठी आणि भारतीय ब्रँडला जागतिक करण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे. आम्ही यात लक्ष घालतोय. '
पतंजलीने देखील यावर अजून अंतिम निर्णय घेण्याचे बाकी असल्याचेही तिजारावाला म्हणाले आहेत.
आयपीएल २०२० च्या मोसमातील नवीन शीर्षक प्रायोजकांच्या शोधात बीसीसीआय आज निविदा प्रसिद्ध करू शकते. विवोच्या जागी आता जिओ, अॅमेझॉन, टाटा ग्रुप, ड्रीम 11 आणि बयजूस कंपन्यांनी आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वात रस दाखवला आहे. बीसीसीआय आयपीएल -13 च्या नवीन प्रायोजकांसाठी संपूर्ण पारदर्शकता आणि प्रक्रियेचे अनुसरण करेल.
VIVO ची जागा मिळवण्यासाठी 440 कोटीपेक्षा कमी रक्कमेची बोली लावावी लागेल. विवोने 2018 ते 2022 पर्यंत पाच वर्ष 2190 कोटी रुपयांचा (प्रत्येक वर्षी 440 कोटी रुपये) आयपीएल शीर्षक प्रायोजक म्हणून करार केला होता. पुढच्या वर्षी विवो मुख्य प्रायोजक म्हणून परत येऊ शकते.
भारतात चिनी उत्पादनांना तीव्र विरोध होत आहे. विवो देखील एक चीनी फोन कंपनी आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमधील संघर्षानंतर बीसीसीआयला देशातील लोकांच्या भावनेचा विचार करुन निर्णय घ्यावा लागला.
आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून एकूण 53 दिवस चालणार आहे. आयपीएल फायनल 10 नोव्हेंबर रोजी होईल. प्रसारकांना दिवाळीच्या आठवड्याचा फायदा देईल. यावेळी आयपीएलचे 10 डबल हेडर (एका दिवसात दोन ) सामने खेळले जातील.