T20 WORLD CUP : अपमानाचा बदला घ्या! पाक खेळाडूंना पंतप्रधान इम्रान खान यांचं आवाहन

न्यूझीलंडचा दौरा रद्द होण्यामागे भारत कारणीभूत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे

Updated: Sep 24, 2021, 04:18 PM IST
T20 WORLD CUP : अपमानाचा बदला घ्या! पाक खेळाडूंना पंतप्रधान इम्रान खान यांचं आवाहन title=

इस्लामाबाद : न्यूझीलंड (New Zealand Cricket Team) आणि इंग्लंड क्रिकेट संघाने (England Cricket Team)  पाकिस्तान (Pakistan) दौरा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये रोष व्यक्त होत आहे. सुरक्षेचा हवाला देत आधी न्यूझीलंड क्रिकेट संघाने ऐन मॅचच्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला. तर इंग्लंडनेही आपला प्रस्तावित दौरा रद्द केला आणि पुरुष आणि महिला संघ पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.  या घटनेमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) संतप्त झाले असून त्यांनी पाकिस्तान संघाची भेट घेत त्यांना या अपमानाचा बदला घेण्याचं आवाहन केलं आहे.

इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम याला आगामी T20 विश्वचषकात  निर्भयपणे वाघासारखे खेळण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि आता पाकिस्तानचे पंतप्रधान असलेल्या इम्रान खान यांनी टी-२० विश्वचषकासाठी निवड झालेल्या पाकिस्तान संघांची भेट घेऊन संघाचं मनोबल वाढवलं. या भेटीत इम्रान खान यांनी खेळाडूंना कामगिरीवर लक्ष केंद्रीत करण्याचं आणि निर्भयपणे क्रिकेट खेळण्याचं आवाहन केलं.

पाकिस्तान एक सुरक्षित देश आहे, खेळाडूंनी आपली कामगिरी सुधारण्यावर भर दिला पाहिजे, लवकरच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आयोजन करणार असल्याचंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याला विशेष सल्ला दिला. सर्व क्रिकेटपटूंन सोबत घेऊन वाघासारखं निर्भिड लढ, असा सल्ला देत इम्रान खान यांनी कर्णधारासह सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

पीसीबी प्रमुख संतापले

पाकिस्तान क्रिकेट सध्या न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धची घरची मालिका अचानक रद्द झाल्याने संघर्ष करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख रमीज राजा यांनी म्हटलं आहे की न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर भारताप्रमाणे हे संघही निशाण्यावर आहेत. टी-२० विश्वचषकात आता भारताबरोबरच न्यूझीलंड आणि इंग्लंडला हरवणं हे आमचं लक्ष्य असेल असं रमीज राजा यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला सुरक्षा यंत्रणांकडून इशारा आल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती. यासाठी पाकिस्तानचे सूचना व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी भारताकडे बोट दाखवलं आहे. न्यूझीलंड संघाला पाक दौरा रद्द करण्याची धमकी भारतातून आली होती, भारतातून हा ईमेल तयार करण्यात आला होता असं फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.