नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचं प्रायोजकत्व पुढल्या पाच वर्षांसाठी ओडिशा सरकारनं स्वीकारलंय. एखाद्या राज्यानं क्रीडा संघाला प्रायोजित करण्याची ही देशातली पहिलीच घटना आहे.
नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला पुरूष आणि महिला हॉकी संघांमधले खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते.
या कार्यक्रमात ओडिशा राज्याच्या लोगोचंही अनावरण करण्यात आलं. हॉकीपटूंच्या जर्सीवर हा लोगो लावण्यात येणार आहे. ओडिशा सरकार आणि हॉकी संघटनेमध्ये नेमका किती रक्कमेचा करार झाला, याची माहिती मिळाली नसली तरी क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी हे एक चांगलं पाऊल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतेय.