मुंबई : भारतीय क्रिकेटर्सची देवाप्रमाणे पुजा केल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तर क्रिकेटचा देव ही पदवी देण्यात आलीये. सचिनशिवाय असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांचे फॅन्स त्यांना भेटण्यासाठी, हात मिळवण्यासाठी तर त्याच्या पायांना स्पर्श करण्यासाठी उत्सुक असतात. तो महेंद्रसिंग धोनी असो वा विराट कोहली. या क्रिकेटर्सना भेटण्यासाठी सुरक्षा रक्षकांचे कडेही तोडतात. मात्र क्रिकेटच्या व्यतिरिक्त फुटबॉलमध्येही असा फॅन पाहायला मिळाला.
भारतात क्रिकेटइतकी फुटबॉलची लोकप्रियता नाही. मात्र आता फुटबॉलचा फिव्हरही भारतात वाढतोय. अंडर १७ वर्ल्डकपचे यजमानपद असो वा फिफा वर्ल्डकप. सोमवारी ४ जूनला हिरो इंटरकॉन्टिनेंटस चषक स्पर्धेत भारत आणि केनिया यांच्यात सामना होणार होता. या सामन्याआधी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याचा १००वा सामना होता. या सामन्याआधी सुनीलने भावुक अपील केले होते.
सुनील छेत्रीने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले, कृपया येथे येऊन आम्हाला पाठिंबा द्या. आम्हाला प्रेरणा द्या. आम्हाला बरे-वाईट म्हटले तरी चालेल. टीका करा तेही चालेल. भारतात फुटबॉलला तुमची गरज आहे.ज्यांना भारतीय फुटबॉलकडून सर्व आशा संपल्यात असे वाटतेय. त्या सगळ्यांना मी स्टेडिययमध्ये येण्याचा आग्रह करतो. इंटरनेटवर खिल्ली उडवणे वा टीका करणे यापेक्षा स्टेडियममध्ये येऊन आमच्यावर ओरडा. सुनील छेत्रीने केलेल्या या अपिलला सचिन तेंडुलकरनेही समर्थन दिले होते.
सुनीलच्या या अपिलनंतर सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्याने फुटबॉल प्रेमी स्टेडिययमध्ये जमा झाले. या सामन्यात खुद्द कर्णधार छेत्रीने दोन गोल करत केनियाला ३-०असे हरवले आणि चाहत्यांना विजयाची भेट दिली. यादरम्यान मैदानात सुनीलचा एक फॅन सुरक्षा रक्षकांचे कडे तोडत सुनीलकडे आला आणि तो पाया पडला. भारतात आतापर्यंत हे केवळ क्रिकेटमध्ये हे पाहायला मिळाले होते. मात्र सोमवारी भारतीय फुटबॉलमध्येही हे चित्र पाहायला मिळाले.