कोहली स्वत:ला भारतीय क्रिकेटचा बॉस समजतोय - इरापल्ली प्रसन्ना

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादादरम्यान भारताचे माजी ऑफ स्पिनर इरापल्ली प्रसन्ना यांनी कोहलीवर जोरदार टीका केलीये.

Updated: Jun 23, 2017, 07:09 PM IST
कोहली स्वत:ला भारतीय क्रिकेटचा बॉस समजतोय - इरापल्ली प्रसन्ना title=

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादादरम्यान भारताचे माजी ऑफ स्पिनर इरापल्ली प्रसन्ना यांनी कोहलीवर जोरदार टीका केलीये.

विराट कोहली स्वत:ला भारतीय क्रिकेटचा बॉस समजतोय. कोहलीचे विचार असे असतील तर संघ प्रशिक्षकाविनाच राहील, अशा शब्दात प्रसन्ना यांनी कोहलीवर टीकास्त्र सोडलेय.

प्रसन्ना यांनी कोहली आणि भारतीय संघाचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणाऱे अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदाबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी असे उत्तर दिले. 

जेव्हा कर्णधार बॉ़स आहे तेव्हा प्रशिक्षकाची त्यांना काय गरज आहे? मला तर असे वाटते की त्यांना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचीही गरज नाहीये. कोहली चांगला क्रिकेटर आहे यात शंकाच नाही. मात्र तो चांगला कर्णधार आहे की नाही याबाबत मी सांगू शकत नाही, असे प्रसन्ना म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, जर अनिल कुंबळेसारख्या दिग्गज क्रिकेटरचा मान राखला जात नसेल तर मला नाही वाटत की बांगड अथवा श्रीधर पूर्ण आत्मविश्वासाने कोहलीशी चर्चा करु शकतात. कर्णधाराचे वागणे असे असेल तर संघाला प्रशिक्षकाची गरजच नाही असे वाटते.