नवी दिल्ली : निडास ट्रॉफीच्या टी-२० सीरिजमधील तिसरी मॅच बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाली. रोमांचक झालेल्या या मॅचमध्ये बांगलादेशच्या टीमने श्रीलंकन टीमला पराभवाची धूळ चारली आहे.
बांगलादेशच्या टीमने श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबतच भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तिन्ही टीम्सचे दोन-दोन पॉईंट्स झाले आहेत. यामुळे आगामी मॅचेस या खूपच रंगतदार होणार असून सर्वच टीम्ससाठी 'करो या मरो' अशी स्थिती असणार आहे.
मॅचच्या सुरुवातीला टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स गमावत २१४ रन्स केले. यामुळे बांगलादेशच्या टीमला २१५ रन्सचं आव्हान निर्माण झालं.
बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीम याने तुफानी बॅटिंग करत ७२ रन्सची नॉट आऊट खेळी खेळली. यामुळे बांगलादेशच्या टीमने श्रीलंकन टीमवर ५ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. आशियाई टीमकडून सर्वश्रेष्ठ स्कोर करणाऱ्या टीम्समध्ये बांगलादेशच्या टीमने अव्वल क्रमांक गाठला आहे.
बांगलादेशच्या टीमने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथं सर्वात मोठं आव्हान गाठलं आहे. या मॅचमध्ये बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमने ३५ बॉल्समध्ये ७२ रन्सची नॉट आऊट खेळी खेळली. यामध्ये पाच फोर आणि चार सिक्सरचा समावेश आहे.
निडास ट्रॉफीमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि टीम इंडिया यांनी प्रत्येकी एक-एक मॅच जिंकल्या आहेत. आता सोमवारी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. सायंकाळी ७ वाजता मॅचचं प्रक्षेपण सुरु होणार आहे.