Asian Games 2023 : गोल्डन बॉय Neeraj Chopra ने पुन्हा जिंकलं सुवर्णपदक!

Neeraj Chopra News :  चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये  88.88 मीटरचा थ्रो केला. तर किशोर जेना (Kishore Jena) याने रौप्यपदक पटकावलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Oct 4, 2023, 06:25 PM IST
Asian Games 2023 : गोल्डन बॉय Neeraj Chopra ने पुन्हा जिंकलं सुवर्णपदक!  title=
Neeraj Chopra win gold medal

Neeraj Chopra win gold medal : सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये  88.88 मीटरचा थ्रो करत नीरजने गोल्ड मेडलला गवासणी घातली आहे. तर भारताच्याच किशोर जेना (Kishore Jena) याने भालाफेकमध्ये रौप्यपदक पटकावलं आहे. भारताने आत्तापर्यंत 16 गोल्ड, 28 सिल्वर आणि 32 ब्रॉन्ज मेडल असं मिळून एकून 76 मेडल्स पटकावली आहेत. त्यात आता दोन मेडल्सची भर पडली आहे.

नीरजच्या थ्रोनंतर वाद

नीरज चोप्राने आपल्या सुवर्णपदकासाठी पहिला थ्रो केला, जो सुमारे 85 मीटर पडला. परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेबसाइटवर त्याची अपडेट आली नाही. तसेच तांत्रिक बिघाडामुळे खेळ थांबवण्यात आला. नीरजने पुन्हा पहिला थ्रो फेकला. तो थ्रो 82.38 मीटर गेला. तांत्रिक बिघाडामुळे थ्रो स्पष्टपणे ओळखता आला नाही. त्यामुळे हा थ्रो रद्द करण्यात आला. तसेच थ्रो देखील फोल़्टी मानला जात नव्हता. नीरजला रिटेकसाठी विचारण्यात आलं. नीरजने त्याच्या दुसऱ्या थ्रोवर अधिक शक्ती वापरली. 

नीरजने दुसरा थ्रो 84.49 मीटर इतक्या वेगाने फेकला. तर किशोर जेनाने 79.76 मीटर असा दुसरा थ्रो केला. तिसऱ्या थ्रोमध्ये नीरज चोप्रा थोडा अस्वस्थ दिसत होता. त्याचा थ्रो फाऊल होता. या थ्रोनंतर तो खूशही दिसत नव्हता. मात्र किशोर जेनाने 86.77 मीटरचा तिसरा थ्रो फेकला आणि नीरजच्या पुढे गेला. त्यानंतर चौथ्या राऊंडमध्ये नीरजने पुन्हा ताकद दाखवली अन् 88.88 मीटरचा थ्रो केला. तर पाचव्या राऊंडमध्ये नीरडने 80.80 मीटरचा थ्रो केला तर किशोर जेना याचा पाचवा थ्रो फाऊल गेला.

नीरज चोप्राचं करियर

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक, जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप आणि डायमंड लीगमध्ये सुवर्णपदकांसह इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव कोरलं आहे. बीजिंग 2008 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्राच्या 10 मीटर एअर रायफलमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरज चोप्राचे टोकियो 2020 मधील सुवर्णपदक हे भारताचे दुसरे वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक होते.

भारतीय भालाफेकपटू टोकियो 2020 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा देशातील पहिला आणि एकमेव ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट ठरला. दोन वर्षांनंतर, तो बुडापेस्ट येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये पोडियममध्ये अव्वल होता आणि कोणत्याही अॅथलेटिक्स शाखेत तो भारताचा पहिला विश्वविजेता ठरला होता. आता त्याने चीनमधील आशियन गेम्समध्ये देखील नीरजने आपल्या कर्तुत्वाची झलक दाखवून दिलीये.