दुबई : आशिया कपच्या पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमनं श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावलं. मुशफिकुरनं 150 बॉलमध्ये 144 रनची खेळी केली. मुशफिकुरच्या या खेळीमुळे बांगलादेशचा 137 रननी विजय झाला. मुशफिकुरचं वनडेमधलं हे सहावं शतक होतं. मुशफिकुरच्या या शतकामध्ये 11 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. या शतकाबरोबरच मुशफिकुर विराट कोहली आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
आशिया कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं 2012 साली पाकिस्तानविरुद्ध 183 रनची खेळी केली होती. आशिया कपमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे. युनूस खाननं 2004 साली हाँगकाँगविरुद्ध 144 रन केले होते. या यादीत युनूस खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आशिया कपमध्ये सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मुशफिकुर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यानंतर शोएब मलिक (2004 साली भारताविरुद्ध 143 रन) आणि विराट कोहली (2014 साली बांगलादेशविरुद्ध 136 रन) यांचा नंबर लागतो.
144 रनची खेळी करणाऱ्या मुशफिकुर रहीमला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. मुशफिकुरच्या शतकामुळे बांगलादेशचा 137 रननी विजय झाला. श्रीलंकेची टीम 35.2 ओव्हरमध्ये 124 रनवर ऑल आऊट झाली. एका वर्षानंतर श्रीलंकेच्या टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या लसीथ मलिंगानं 23 रनमध्ये 4 विकेट घेतल्या.