Pakistan Cricket Team : एका ओव्हरमध्ये 17 बॉल, 7 No Ball, 4 वाइड टाकणारा गोलंदाज निवडणार पाकिस्तानी टीम

Pakistan Men Selection Committee: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बुधवारी हारुन रशीद आणि कमरान अकमाल यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रम वरिष्ठ आणि ज्युनियर पुरुष निवड समितीची घोषणा केली होती. निवड समितीमध्ये एक सदस्य असाही आहे ज्याच्या नावावर आशिया कपमध्ये एकाच षटकामध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आहे.

Updated: Feb 2, 2023, 03:17 PM IST
Pakistan Cricket Team : एका ओव्हरमध्ये 17 बॉल, 7 No Ball, 4 वाइड टाकणारा गोलंदाज निवडणार पाकिस्तानी टीम title=
pakistan cricket team

Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बुधवारी पुरुषांच्या क्रिकेटसंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली. पुरुषांचा मुख्य संघ आणि ज्युनियर संघ निवडण्यासाठीची निवड समिती (pakistan men selection committe) कशी असेल याची घोषणा करताना हारुन रशीदच्या (Haroon Rasheed) नेतृत्वाखाली मुख्य संघाची निवड समिती तर कामरान अकमलच्या नेतृत्वाखाली ज्युनियर संघाची निवड करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.  हारुन रशीद वरिष्ठ संघाची निवड करणाऱ्या समितीचे प्रमुख असतील ज्यामध्ये कामरान अकमल, यासिर हमीद आणि मोहम्मद सामीसारख्या (Mohammad Shami) खेळाडूंचा समावेश असेल. हे सर्व पाकिस्तानचे माजी कसोटीपटू आहेत.

निवड समितीमध्ये हे दिग्गज

निवड समितीचा सदस्य असलेल्या मोहम्मद सामीने पाकिस्तानकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. पाकिस्तानसाठी त्याने 36 सामन्यांमध्ये 85 विकेट्स घेतल्या आहेत. तर 87 सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहेत. तर 13 टी-20 सामन्यांमध्ये सामीने 21 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही आहे. हा विक्रम आहे आशिया चषकामध्ये सर्वात महागडी ओव्हर टाकण्याचा.

17 चेंडू अन् 22 धावा एकाच ओव्हरमध्ये

मोहम्मद सामीने एशिया चषकाच्या 2004 च्या पर्वामध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम केलेला. त्याने एका षटकामध्ये तब्बल 17 चेंडू टाकले होते. यात 7 वाइड, 4 नो बॉलचा समावेश होता. या एका षटकात त्याने तब्बल 22 धावा दिल्या होत्या.

पहिल्यांदाच या तिघांचा समावेश

पाकिस्तानच्या राष्ट्रीय ज्युनियर निवड समितीचे अध्यक्षपद पाकिस्तानच्या मुख्य संघामध्ये स्थान मिळत नसलेला विकेटकीपर- फलंदाज कामरान अकमलकडे देण्यात आलं आहे. ज्यूनियर निवड समितीचे अन्य सदस्यांमध्ये तौसीफ अहमद, अरशद खान, शाहिद नजीर आणि शोएब खान आहेत. यापैकी कामरान, यासिर आणि सामीला राष्ट्रीय निवड समितीमध्ये पहिल्यांदाच स्थान देण्यात आलं आहे.

पाकिस्तान कोणते सामने खेळणार?

पाकिस्तान आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार आहे. न्यूझीलंड या दौऱ्यामध्ये यजमान संघाविरुद्ध पाच एकदिवसीय सामने आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात पाकिस्तानी संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पाकिस्तानी संघ अफगाणिस्तानमध्ये त्रयस्त ठिकाणी सामने खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळणार असून यंदा पाकिस्तान या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानी संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळणार आहे.