हॅमिल्टन : टेस्ट सीरिजआधी भारत आणि न्यूझीलंड-११ मध्ये झालेला ३ दिवसीय सराव सामना ड्रॉ झाला आहे. पण या मॅचमध्ये पंत आणि मयंक अग्रवाल यांनी चांगली कामगिरी केली. पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी शेवटच्या दिवसाची सुरुवात ५९/० अशी केली. यानंतर लगेचच पृथ्वी शॉ ३९ रनवर आऊट झाला.
सराव सामन्यांमध्ये शुभमन गिल हा पुन्हा एकदा अपयशी ठरला. पृथ्वी शॉ पाठोपाठ डॅरेल मिचेलने शुभमन गिललाही ८ रनवर माघारी पाठवलं. पहिल्या इनिंगमध्ये शुभमन गिल पहिल्याच बॉलला आऊट झाला होता. पण मयंक अग्रवालने मात्र ९९ बॉलमध्ये ८१ रनची खेळी केली. दुसऱ्या खेळाडूंना बॅटिंग मिळावी म्हणून मयंक अग्रवाल रिटायर्ड हर्ट झाला.
न्यूझीलंड दौऱ्यात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या ऋषभ पंतने जलद ७० रन केले, यामध्ये ४ फोर आणि ६ सिक्सचा समावेश होता. ऋद्धीमान सहा ३० रनवर नाबाद आणि आर अश्विन १६ रनवर नाबाद राहिले. भारताने ४८ ओव्हरमध्ये २५२ रन केले.
सराव सामन्यामध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताचा २६३ रनवर ऑलआऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये हनुमा विहारीने १०१ रन तर चेतेश्वर पुजाराने ९३ रनची खेळी केली. भारताची इनिंग संपल्यानंतर बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडचा २३५ रनवर ऑलआऊट झाला. मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि नवदीप सैनीला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. आर. अश्विनला १ विकेट घेण्यात यश आलं.
सराव सामन्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. सीरिजची पहिली मॅच २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये आणि दुसरी मॅच २९ फेब्रुवारीपासून क्राईस्टचर्चमध्ये होणार आहे. टी-२० सीरिजमध्ये भारताने न्यूझीलंडचा ५-०ने पराभव केल्यानंतर वनडे सीरिजमध्ये किवींनी जोरदार पुनरागमन केलं. न्यूझीलंडने वनडे सीरिज ३-०ने जिंकली.