Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरीच्या 2023 मधील अंतिम चौघांची (Maharashtra Kesari 2023 Final) नावे समोर आली आहे. माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख आणि गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांनी धडक मारली आहे. तिसऱ्या दिवशी अनेक देखण्या आणि चित्तथरारक कुस्त्या पाहायला मिळाल्या. यामधील एक म्हणजे बाला रफिक शेख आणि सिकंदर शेखची. सिकंदरने भारदस्त शरीरयष्टी असणाऱ्या रफिकला अवघ्या 40 सेकंदामध्ये आस्मान दाखवलं. (Maharashtra Kesari 2023 Bala Rafiq sheikh and Sikandar sheikh kusti 2023 viral video latest marathi news)
बाला रफिक शेखने सातारचा पैलवान किरण भगतला अवघ्या 15 सेकंदात आस्मान दाखवलं होतं. बुलढाणाच्या रफिकची आणि सिकंदरमधील कुस्ती डोळ्याचं पारणं फेडणारी होईल अशी सर्वांना आशा होती. सिकंदर यंदाच्या 'महाराष्ट्र केसरी'चा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
सिकंदर आणि रफिकची कुस्ती चालू होताचा पहिल्या पाच सेकंदामध्ये एकेरी पट काढत रफिकने दोन गुणांची कमाई केली. सिकंदर काही कच्चा नाही त्याने शक्ती आणि युक्तीची सांगड घालत रफिकला भारंदाज डाव टाकत चीतपट केलं. सिकंदरचा डाव थोडा जरी चुकला असता तर पूर्ण गेम उलटा झाला असता. सिकंदरने त्याची पूर्ण ताकद लावत बाला रफिकला आस्मान दाखवलं.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील करमाळाच्या बाला रफिक शेखने 2018 मध्ये महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं होतं. गणपतराव आंदळकर यांचा बाला रफिक शेख हा शेवटचा शिष्य. बालाने नुकताच हिंद केसरीवर नाव कोरणाऱ्या अभिजीत कटकेचा 2018 ला पराभव केला होता.