मुंबई : आयपीएलच्या ११व्या सीझनमधील सर्वच संघांमध्ये जोरदार मुकाबला सुरु आहे. त्यांच्यात घमासान युद्ध सुरु आहे. या सीझनमध्ये पंजाबमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांनाच चक्रावून टाकलेय. यात ख्रिस गेलची खास चर्चा आहे. ख्रिस गेलने सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र रविवारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात लोकेश राहुलने ५४ चेंडूत जबरदस्त कामगिरी करताना ८४ धावा तडकावल्या.
या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनीही चांगला खेळ केला. स्पिनर्सनी चांगली कामगिरी करताना राजस्थानला ९ बाद १५२ धावांवर रोखले. राजस्थान खेळताना असे वाटत होते की ते २००चा आकडा पार करतील मात्र पंजाबच्या स्पिनर्सनी ही धावसंख्या वाढवू दिली नाही. तर दुसरीकडे पंजाबच्या फलंदाजांसाठी पिच सोपी नव्हती मात्र राहुलने न केवळ आपली विकेट वाचवली तर वेगाने धावा करताना संघासाठी विजय सुकर केला.
राहुलने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये ५१, ३७,१८, ६०, २३, ३२, २४ आणि ८४ धावा केल्यात. त्याचा स्ट्राईक १६२.७७ इतका आहे. ९ सामन्यांतील केवळ ६ सामन्यांमध्ये राहुलचा स्ट्राईक रेट १५०हून अधिक राहिलाय. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तर त्याचा स्ट्राईक रेट २२२ इतका होता. लोकेशने आतापर्यंत ४२ चौकार आणि १७ षटकार लगावलेत. सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
पंजाबचा सध्याचा फॉर्म पाहता ते प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठीचे प्रबळ दावेदार आहेत. पहिल्या दोन सामन्यांत ख्रिस गेल खेळला नव्हता. त्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पंजाबने विजय मिळवला होता. त्यानंतर ख्रिस गेल खेळण्यास आला तेव्हा त्याने संघाला टॉपवर पोहोचवले.
लोकेश राहुल या सीझनमधील पहिल्याच सामन्यात चर्चेत आला होता. जेव्हा त्याने १४ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याने युसुफ पठाणचा रेकॉर्ड तोडला होता. युसुफ कोलकाताकडून खेळत असताना त्याने १५ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.