मुंबई : आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने त्यांचा कर्णधार केएल राहुलला रिलीज केलं. पंजाब किंग्सने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंगला कायम ठेवलं आहे. यावेळी के.एल राहुलला का रिलीज केलं याचं कारण आता समोर आलं आहे. टीमचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी याबाबत खुलासा केला आहे.
पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितलं की, फ्रँचायझी केएल राहुलला त्यांच्यासोबत ठेवू इच्छुक होते, परंतु राहुलने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही राहुलच्या निर्णयाचा आदर करतो आणि तो त्याचा अधिकार आहे.
IPL 2022च्या मेगा लिलावात राहुलचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊच्या नव्या टीमचं नेतृत्व करू शकतो. दोन नवीन आयपीएल फ्रँचायझींकडे लिलावापूर्वी 3 खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय आहे.
अनिल कुंबळेने स्टार स्पोर्ट्सला सांगितलं की, "आम्ही केएल राहुलला कायम ठेवू इच्छित होतो. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी आम्ही त्याची कर्णधार म्हणून निवड केली होती. पण त्याने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचा आदर करतो. तो खेळाडूचा विशेषाधिकार आहे."
पंजाब किंग्जमध्ये सामील झाल्यानंतर राहुलने जोरदार फटकेबाजी केली. गेल्या 4 हंगामात त्याने 659, 593, 670 आणि 626 धावा केल्या. त्याने आयपीएल 2020 मध्ये ऑरेंज कॅपही जिंकली होती.