मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक नियुक्तीसाठी गुरुवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत. बीसीसीआयची निवड समिती गॅरी कर्स्टन, हर्षल गिब्स आणि रमेश पोवार यांच्यासह इतर इच्छुकांच्या मुलाखती घेतील. प्रशिक्षकपदासाठी २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातल्या कर्स्टन, गिब्स आणि पोवार यांच्यासोबत डब्ल्यूव्ही रमण, वेंकटेश प्रसाद, मनोज प्रभाकर, ट्रेंट जॉन्सटन, मार्क कोल्स, दिमित्री मास्करेनस आणि ब्रॅड हॉग यांच्यामधल्या एकाची प्रशिक्षक म्हणून निवड होईल. यातले गॅरी कर्स्टन हे आधी भारतीय पुरुष टीमचे प्रशिक्षक होते. ते प्रशिक्षक असताना भारतानं २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला होता.
प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असणाऱ्या या सगळ्यांच्या मुलाखती कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची समिती घेणार आहे. यातल्या बहुतेक परदेशी खेळाडूंची मुलाखत स्काईपवरून होईल, तर रमेश पोवार स्वत: मुलाखत द्यायला पोहोचतील. मुलाखत घेणाऱ्या समितीमध्ये सगळे खेळाडू दिग्गज आहेत आणि ते सर्वोत्तम उमेदवाराची प्रशिक्षक म्हणून निवड करतील, असा आम्हाला विश्वास असल्याची प्रतिक्रिया बीसीसीआयमधल्या एका अधिकाऱ्यानं दिला.
सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेले अध्यक्ष विनोद राय आणि डायना एडुल्जी यांच्या प्रशासकिय समितीमध्ये प्रशिक्षन निवडीच्या प्रक्रियेवरून मतभेद आहेत. रमेश पोवार यांना पुढच्या महिन्यातल्या न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत प्रशिक्षक म्हणून कायम ठेवावं, अशी मागणी डायना एडुल्जी यांनी केली होती. पण विनोद राय यांनी ही मागणी फेटाळत नवीन प्रशिक्षक भरतीसाठी अर्ज मागवून घेण्याचे आदेश दिले.
पोवार यांची वादग्रस्त कारकिर्द ३० नोव्हेंबरला संपली होती. टी-२० वर्ल्ड कपवेळी भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये टीममधून डच्चू देण्यात आला. या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. यानंतर मिताली राजनं रमेश पोवार यांच्यावर आरोप केले. रमेश पोवार यांनीही मिताली राजच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
भारतीय टी-२० टीमची कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या समर्थनानंतर रमेश पोवार यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरला. पण टी-२० वर्ल्ड कपदरम्यान झालेला वाद रमेश पोवार यांच्या विरोधात जाऊ शकतो. वेस्ट इंडिजमधून टी-२० वर्ल्ड कप संपल्यानंतर परतल्यावर मिताली राजनं रमेश पोवार आणि डायना एडुल्जी यांच्यावर कारकिर्द संपवण्याचा आणि भेदभाव केल्याचा आरोप केला.
मिताली राजनं टी-२० वर्ल्ड कपमध्ये ओपनिंगला खेळवलं नाही तर निवृत्ती घ्यायची धमकी दिली आणि टीममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा दावा रमेश पोवार यांनी केला.