चंडीगड : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. २०१७ सालची आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिली मॅच होईल. पण यंदाच्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या घरच्या मैदानात बदल करण्यात आला आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या घरच्या ३ मॅच मोहालीमध्ये तर उरलेल्या ४ मॅच इंदूरमध्ये होतील. कोणत्याही टीमला घरच्या मैदानात ४ मॅच खेळवणं बंधनकारक आहे पण तांत्रिक अडचणींमुळे पंजाबच्या टीमला ४ मॅच इंदूरमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. १२ मे ते ३१ मे हे २० दिवस आणि एप्रिलमधले सगळे रविवार चंदीगड विमानतळ बंद असणार आहे. त्यामुळे पंजाबच्या मॅच इंदूरला हलवण्यात आल्या आहेत.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीमचं दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन झालं आहे. या टीम पुन्हा आयपीएलमध्ये आल्यामुळे पुणे आणि गुजरातची टीम आयपीएलमध्ये दिसणार नाही. पुण्याची टीम यंदाच्या आयपीएलमध्ये नसली तरी पुण्याच्या मैदानात मॅच खेळवल्या जाणार आहेत. आयपीएलची एलिमिनेटर मॅच आणि क्वालिफायर राऊंडची दुसरी मॅच पुण्यात खेळवण्यात येईल. २३ मे आणि २५ मे रोजी पुण्यामध्ये आयपीएलच्या मॅच खेळवल्या जातील.