केएल राहुलचा कर्नाटक सरकार एकलव्य पुरस्कार देऊन करणार सन्मान

केएल राहुलसाठी अभिमानाचा क्षण...

Updated: Nov 2, 2020, 08:03 PM IST
केएल राहुलचा कर्नाटक सरकार एकलव्य पुरस्कार देऊन करणार सन्मान title=

बंगळुरु : किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वात संघाने काही सामने जिंकले पण शेवटच्या सामन्यात पंजाबला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या 13 व्या सत्रातून पंजाब संघ बाहेर झाला. या पराभवामुळे केएल राहुल खूप निराश झाला, पण त्यानंतर त्याच्यासाठी एक चांगली बातमी आली आहे. कर्नाटक राज्य सरकारने त्याचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकचा राहणारा लोकेश राहुल याला क्रीडा जगातील उत्कृष्ट कामगिरीमुळे यंदा राज्याचा सर्वोच्च क्रीडा सन्मान देण्यात येईल. खुद्द केएल राहुल याने याची पुष्टी केली आहे. केएल राहुलला कर्नाटक राज्य सरकारकडून एकलव्य पुरस्कार मिळणार आहे. कर्नाटक सरकार अनेक दशकांपासून या पुरस्काराचे वितरण करत आहे.

केएल राहुल याने या पुरस्काराविषयी ट्विट करत म्हटलं की, "मला एकलव्य पुरस्कार प्रदान केल्याबद्दल कर्नाटक सरकारचे आभार. माझे प्रशिक्षक, सहकारी, मित्र आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. मी माझं राज्य व भारताचा अभिमान वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे." 

केएल राहुलने आयपीएल 2020 मध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 670 धावा केल्या आहेत.

केएल राहुलने 2019 ते 2020 या काळात जोरदार कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा घरगुती क्रिकेट किंवा आयपीएलमध्ये त्याची चर्चा आहे. लोकेश राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे.