'म्हणून १० वर्षात पहिल्यांदाच पराभव झाला'

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. 

Updated: Nov 2, 2017, 11:39 PM IST
'म्हणून १० वर्षात पहिल्यांदाच पराभव झाला' title=

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा हा पहिलाच टी-20मधला विजय आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७ टी-20 पैकी ५ मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. तर २०१२ साली विशाखापट्टणममधली टी-20 रद्द करण्यात आली होती.

२००७ साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी-20 सामना झाला होता. त्यानंतर बरोबर १० वर्षांनी भारतानं न्यूझीलंडला मात दिली. या पराभवावर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसननं प्रतिक्रिया दिली आहे. खराब फिल्डिंगमुळे आमचा पराभव झाल्याचं विलियमसन म्हणाला आहे.

या मॅचमध्ये न्यूझीलंडनं तीन कॅच सोडले. यामध्ये ओपनिंग बॅट्समन शिखर धवन आणि रोहित शर्माचाही समावेश होता. सोडलेल्या या कॅचचा धवन आणि रोहितनं फायदा घेतला. ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवननं १५८ रन्सची पार्टनरशीप केली. शिखर धवननं ५२ बॉल्समध्ये ८० तर रोहित शर्मानं ५५ बॉल्समध्ये ८० रन्स केल्या. तर विराट कोहलीनं ११ बॉल्समध्ये नाबाद २६ आणि धोनीनं २ बॉल्समध्ये नाबाद ७ रन्स बनवले. वनडे सीरिज २-१नं जिंकल्यानंतर आता ३ मॅचच्या टी-20 सीरिजमध्ये भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे.

भारतानं ठेवलेल्या २०३ रन्सचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० ओव्हर्समध्ये १४९/८ एवढा स्कोअर करता आला. युझुवेंद्र चहाल आणि अक्सर पटेलनं न्यूझीलंडच्या दोन विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली. शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या आशिष नेहराला एकही विकेट मिळाली नाही. नेहरानं ४ ओव्हरमध्ये २९ रन्स दिल्या.