विराटचा पहिला क्रमांक धोक्यात, हा खेळाडू शर्यतीत

आयसीसीच्या टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीत विराट कोहली हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

Updated: Mar 5, 2019, 04:42 PM IST
विराटचा पहिला क्रमांक धोक्यात, हा खेळाडू शर्यतीत title=

दुबई : आयसीसीच्या टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीत विराट कोहली हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पण आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये विराट कोहलीचा पहिला क्रमांक धोक्यात आला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा आयसीसी टेस्ट क्रमवारीत विराट कोहलीच्या जवळ आला आहे. नव्या क्रमवारीत केन विलियमसनला १८ पॉईंटचा फायदा झाल्यामुळे त्याच्या खात्यात ९१५ पॉईंट झाले आहेत. केन विलियमसन पहिल्यांदाच एवढ्या पॉईंटपर्यंत पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विलियमसननं नाबाद २०० रनची खेळी केली. याचा फायदा विलियमसनला पॉईंटमध्ये झाला.

विराट कोहलीचे टेस्टमध्ये ९२२ पॉईंट आहेत. या दोन्ही खेळाडूंमध्ये आता फक्त ७ पॉईंटचा फरक आहे. विराट कोहली आता जुलै महिन्यापर्यंत टेस्ट मॅच खेळणार नाही. तर केन विलियमसन बांगलादेशविरुद्ध आणखी २ टेस्ट मॅच खेळणार आहे. त्यामुळे विलियमसनकडे कोहलीच्या पुढे जाऊन पहिला क्रमांक गाठण्याची संधी आहे.

पुजारा तिसऱ्या क्रमांकावर

भारताचा चेतेश्वर पुजारा टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचे टॉम लेथम ११व्या क्रमांकावर, जीत रावल ३३व्या क्रमांकावर आणि हेनरी निकोलस दोन स्थान खाली सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

बॉलरच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर, जेम्स अंडरसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. तर रवीचंद्रन अश्विन दहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टचं २ क्रमांकांचं नुकसान झाल्यामुळे तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. टीम साऊदी नवव्या क्रमांकावर कायम आहे.