दुबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारतीय महिला टीमचा २-१नं विजय झाला. ही सीरिज जिंकण्यात भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीनं महत्त्वाची भूमिका बजावली. या सीरिजमध्ये झुलन गोस्वामीनं ८ विकेट घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर ३६ वर्षांची झुलन गोस्वामी आयसीसीच्या महिला बॉलरच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. याआधी फेब्रुवारी २०१७ सालीही झुलन गोस्वामी महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर गेली होती. ही सीरिज जिंकल्यामुळे भारत ८ टीमच्या चॅम्पियनशीपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंड आणि क्रमवारीतल्या सुरुवातीच्या ४ टीम २०२१ सालच्या महिला वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश करतील.
वनडे क्रिकेटमध्ये २१८ विकेट घेणारी झुलन गोस्वामी सर्वाधिक काळ पहिल्या क्रमांकावर राहण्याच्या रेकॉर्डच्याही जवळ पोहोचली आहे. झुलन गोस्वामी १,८७३ दिवस पहिल्या क्रमांकावर आहे. या रेकॉर्डमध्ये ऑस्ट्रेलियाची माजी फास्ट बॉलर कॅथरीन फिट्जपॅट्रिकचा पहिला क्रमांक लागतो. कॅथरीन २,११३ दिवस पहिल्या क्रमांकावर होती.
झुलनची साथीदार असलेली फास्ट बॉलर शिखा पांडेला १२ स्थानांचा फायदा झाला आहे. यामुळे शिखा ५व्या क्रमांकावर पोहोचली आहे. शिखानं इंग्लंडविरुद्ध ८ विकेट घेतल्या होत्या. ९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताच्या २ फास्ट बॉलर टॉप-५ मध्ये आहेत. याआधी २०१० साली झुलन आणि रुमेली धर टॉप-५ मध्ये होत्या.
आयसीसी महिला चॅम्पियनशीपमध्ये स्मृती मंधानानं सर्वाधिक ८३७ रन केले आहेत. यामुळे ७९७ पॉईंटसह स्मृती मंधानानं क्रमवारीतला तिचा पहिला क्रमांक आणखी मजबूत केला आहे. याआधी २०१२ साली भारताची बॉलर आणि बॅट्समन पहिल्या क्रमांकावर होते. त्यावेळी मिताली राज आणि झुलन गोस्वामी पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते.
या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या सीरिजचा निकालही ग्राह्य धरण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा ३-०नं पराभव केला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेशाकडे वाटचाल केली आहे. ऑस्ट्रेलिया १२ मॅचमध्ये २२ पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे.
भारत १५ मॅचमध्ये १४ पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड १५ मॅचमध्ये १४ पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागची वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड १२ मॅचच्या १२ पॉईंटसह दक्षिण आफ्रिकेनंतर पाचव्या स्थानावर आहे.
१६ मार्चपासून इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये ३ वनडे मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये ३-०नं विजय झाला तर इंग्लंडची टीम भारताच्या पुढे जाईल. श्रीलंकेला १२ मॅचमध्ये फक्त एकच विजय मिळाला आहे. त्यामुळे श्रीलंकेची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे.