Root Vs Sachin: भारतीयाचा विक्रम मोडला जाऊ नये म्हणून BCCI चा कट? 'त्या' विधानाने खळबळ

Joe Root Vs Sachin Tendulkar: सध्या जागतिक क्रिकेटमध्ये चर्चा आहे ती जो रुटची. जो रुट ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहता तो मागील 20 वर्षांपासून सचिन तेंडुलकरच्या नावावर असणारा विक्रम मोडणार असं निश्चित मानलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता एका विचित्र दावा करण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 7, 2024, 10:51 AM IST
Root Vs Sachin: भारतीयाचा विक्रम मोडला जाऊ नये म्हणून BCCI चा कट? 'त्या' विधानाने खळबळ title=
थेट बीसीसीआयचा उल्लेख करत विधान (प्रातिनिधिक फोटो)

Joe Root Vs Sachin Tendulkar: इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रुट हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका अभेद्य विक्रमाच्या जवळपास आला आहे. सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी जो रुटला केवळ साडेतीन हजार धावांची गरज आहे. जो रुट हा सध्या 33 वर्षांचा असून तो ज्या पद्धतीने खेळत आहे ते पाहता सचिनचा विक्रम मोडणं त्याचा फारसं कठीण जाणार नाही असं चित्र सध्या दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या इंग्लंडच्या कसोटीमध्ये जो रुटने दोन्ही डावांमध्ये शतक झळकावल्याने सचिनच्या चाहत्यांची धडधड वाढली आहे. सचिन तेंडुलकर हा मागील 20 वर्षांपासून सर्वाधिक कसोटी धावा करणारा क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मात्र त्याचा हा विक्रम मोडू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झालं तर जो रुटचं नाव हे जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत सचिनच्याही आधी घेतलं जाईल. 

बीसीसीआयचं नाव घेत गंभीर विधान

खरं तर आताच जो रुटचं नाव 'फॅब फोर' म्हणजेच चार भन्नाट खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसनबरोबरचा चौथा भिडू म्हणून घेतलं जातं. सध्या जो रुट ज्या पद्धतीने खेळत आहे हे पाहता तो या चौघांमध्येही अग्रस्थानी आहे. यावरुनच आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने काही काळातच जो रुट हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावा करणारा क्रिकेटपटू ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. जो रुटबरोबर काही विचित्र घडलं नाही तर तो लवकरच कसोटीमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल असं मायकल वॉर्न म्हमाला आहे. मात्र हे विधान करताना मायकल वॉर्नने जो रुटला भारतीयाचा विक्रम मोडून सर्वोच्च स्थानी न पोहचू देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काहीतरी कट रचू शकतं अशी विचित्र शक्यताही व्यक्त केली आहे. भारतीयच या यादीत अव्वल स्थानी रहावा म्हणून येन-केन प्रकारे बीसीसीआय नक्कीच प्रयत्न करेल असं मायकल वॉर्नने म्हटलं आहे. 

इशारा जय शाहांकडे?

जो रुट सचिनचा विक्रम मोडेल का? या प्रश्नावर मायकल वॉर्नने 'होय,' असं उत्तर दिलं. "मला वाटतं तो साडेतीन हजार धावांनी पिछाडीवर आहे. त्याच्याकडे असून तीन वर्ष आहेत. त्याला दुखापत झाली नाही तर तो नक्कीच हे करेल. तो आता कर्णधार नाही. त्याला त्याचा खेळ चांगला समजतो. त्याने हा विक्रम मोडला नाही तर मला आश्चर्य वाटेल. तो सध्या फार छान खेळतोय. जो रुटने सचिनचा विक्रम मोडला तर ते क्रिकेटसाठी फार उत्तम असेल. कारण बीसीसीआयला या यादीमध्ये इंग्लंडचा खेळाडू सर्वोच्च स्थानी असावा असं नक्कीच वाटत नसणारं. त्यांना या यादीत भारतीयच अव्वल स्थानी हवा असेल. कारण त्याला (जो रुटला) मागे टाकण्यासाठी अती प्रचंड वेळ जाईल," असं मायकल वॉर्नने म्हटलं आहे. बीसीसीआयचे सचिव राहिलेले जय शाह नुकतेच आयसीसीचे अध्यक्ष झाले असल्याने मायकल वॉर्नच्या बोलण्याचा कल त्यांच्या दिशेने आहे का अशी शंकाही क्रिकेट चाहते व्यक्त करत आहे. सचिनचा विक्रम मोडण्यापासून जो रुटला रोखण्यासाठी बीसीसीआय काहीतरी मोठी खेळी करु शकतं किंवा एखादा कट रचू शकतं असे संकेत मायकल वॉर्नने त्याच्या विधानातून दिलेत असं बोललं जात आहे.

गिलक्रिस्ट मात्र शंका

मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलक्रिस्टने जो रुट सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल की नाही याबद्दल आताच सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. "त्याची धावांची भूक कधी संपेल सांगता येत नाही. तो आता 33 वर्षांचा आहे. सध्या तरी त्याची धावांची भूक कायम दिसतेय. सॉरी मी पुढच्या अॅशेज सिरीजनंतर याचं उत्तर देईन," असं गिलक्रिस्ट म्हणाला.