दुबई : भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर सर रवींद्र जडेजाला रविवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले.
पहिला म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वनडेत जडेजाला संघात आरामाच्या नावाखाली स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर आयसीसीच्या ताज्या टेस्ट रँकिंगनुसार रवींद्रला आपले अव्वल स्थान गमवावे लागलेय.
इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने जडेजाला मागे टाकत बॉलर्सच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. नुकताच अँडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये ५०० विकेट पूर्ण केल्या. ५०० विकेट घेणारा तो सहावा क्रिकेटर ठरलाय.
आयसीसीच्या ताज्या रँकिगनुसार अँडरसन ८९६ गुणांसह पहिल्या स्थानी आहे तर जडेजा ८८४ गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरलाय. भारताचा दुसरा ऑलराऊंडर क्रिकेटर आर. अश्विन तिसऱ्या स्थानी आहे. त्याचे ८५२ गुण आहेत.
बॅट्समनच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ ९३६ गुणासह पहिल्या स्थानी आहे. या यादीत चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानी आहे. कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानी आहे. लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे दोघांनाही एक-एक स्थानाचा फायदा होत ते अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर पोहोचलेत.