Irfan Pathan 15 member Squad For T20 World Cup: इंडियन प्रिमिअर लीगचं अर्ध्याहून अधिक पर्व संपलं आहे. पहिल्या 39 सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलमधील चित्र थोडंफार स्पष्ट झालं आहे. कोणत्या संघांसाठी प्लेऑफचे दरवाजे सहज उघडणार आणि कोणासाठी प्लेऑफ दिवास्वप्न राहणार याचा अंदाज सध्या बांधता येत आहे. सध्या सर्वच संघांना अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. कोणताही संघ प्लेऑफच्या शर्यतीमधून अद्याप अधिकृतरित्या बाहेर पडलेला नाही. मात्र यापैकी एक संघ जवळपास प्लेऑफमध्ये निश्चित मानला जात आहे. मात्र या संघाच्या यशामागे असलेल्या व्यक्तीलाच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने संभाव्य टी-20 वर्ल्डकप संघामधून डच्चू दिला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधाराला पठाणने त्याच्या टी-20 वर्ल्डकप संघामध्ये स्थान दिलेलं नाही.
टी-20 वर्ल्डकप 2024 साठी संघ निवड करण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या पर्वानंतर 5 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी-20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचीही लवकरच घोषणा केली जाईल. असं असतानाच अनेक माजी क्रिकेटपटू त्यांच्यामते कोणाला संघात संधी दिली पाहिजे यासंदर्भातील मतं मांडत आहेत. यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीला स्थान दिलं जावं की नाही यासंदर्भातील चर्चा सुरु आहे. मात्र विराटचा स्ट्राइक रेट आणि आक्रमकता पाहता त्याला स्थान दिलं जावं असं अनेकांचं म्हणणं आहे. भारताच्या टी-20 संघामध्ये एकमेव वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेला हार्दिक पंड्यालाही स्थान मिळेल की नाही हे निश्चित नाही. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये पंड्याला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही चमक दाखवता आलेली नाही. पंड्याला मुंबई इंडियन्सचं नेतृत्ववही प्रभावशाली पद्धतीने करता येत नसल्याचं स्पष्ट होत आहे. असा सारा गोंधळ असतानाच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने त्याच्या मते कोणत्या 15 खेळाडूंना यंदाच्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाठवलं पाहिजे याची यादीच जारी केली आहे. इरफानने निवडलेला टी-20 वर्ल्डकपसाठीचा टीम इंडियाचा संघ कसा आहे पाहूयात...
सलामीवीर म्हणून इरफान पठाणने रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवालला पहिली पसंती दर्शवली असून तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली हवा असं त्याचं म्हणणं आहे. या तिघांपैकी कोणलाही सलामीवीर म्हणून वापरता येईल आणि राखीव सलामीवीर म्हणून शुभमन गिलचा विचार करता येईल असं पठाणचं म्हणणं आहे. दोन स्लॉटसाठी पठाणने चार खेळाडू निवडले आहेत. हे चौघे टॉप तीन स्लॉटमध्ये गरजेनुसार वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये खेळू शकतात. इथे पठाणने के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांना संघातून पूर्णपणे वगळलं आहे.
मधल्या फळीमध्ये पठाणने सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह आणि शिवम दुबेची निवड केली आहे. तसेच पठाणने हार्दिक पंड्यालाही वेगवान गोलंदाजी करणारा एकमेव अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी दिली आहे. विशेष म्हणजे पठाणने आपल्या संघामध्ये यंदाच्या पर्वामध्ये आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनला संधी दिलेली नाही. पठाणने विकेटकीपर म्हणून केवळ पंतला संघात स्थान दिलं आहे.
नक्की वाचा >> 'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलं
विशेष म्हणजे पठाणने मधल्या फळीतील ज्या खेळाडूला वगळलं आहे त्यामध्ये यंदाच्या आयपीएलमध्ये 39 सामन्यांत सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या संजू सॅमसनचाही समावेश आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने पहिल्या 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. आपल्या 7 विजयांसहीत राजस्थानचे सध्या 14 पॉइण्ट्स आहेत. आता केवळ एका विजयासहीत राजस्थानचं स्थान प्लेऑफमध्ये जवळपास निश्चित होईल. राजस्थानच्या संघाने पहिल्या पर्वात जेतेपद जिंकल्यानंतर त्यांना या स्पर्धेत फारसं यश मिळालेलं नाही. हा अपयशाचा शिक्का पुसून काढण्याची संध्या नामी संधी राजस्थानच्या संघाकडे आहे. संजूच्या नेतृत्वाखाली संघाचा खेळही बहरतोय. असं असतानाही पठाणने त्याला त्याच्या टी-20 संघात स्थान दिलं नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र 2007 साली पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग असलेल्या पठाणने संजूला वगळल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. संजूला संधी का देण्यात आली नाही असं बऱ्याच चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे. एका विकेटकीपरसहीत अमेरिकेत जाणार का? असा प्रश्न एकाने विचारला आहे. अन्य एकाने सिरीअसली हा संघ घेऊन जाणार आहेस अमेरिकेत? असा प्रश्न पठाणला विचारला आहे. अन्य एकाने संजूने अजून काय करायला हवं म्हणजे त्याला संघात स्थान मिळेल असा प्रश्न विचारला आहे.
विशेष म्हणजे आयपीएलपूर्वी झालेल्या अनेक मालिकांमध्ये संजूचा संघात समावेश करण्यात आलेला नव्हता. अनेकदा यासंदर्भात चाहत्यांनी सोशल मीडियावरुन नाराजीही व्यक्त केली होती. मात्र ज्यापद्धतीने संजूने राजस्थानच्या संघाचं नेतृत्व केलं आहे ते पाहता आता त्याला थेट संघात स्थान देऊन भावी कर्णधार म्हणून हळूहळू ग्रूम करावं अशी मागणी माजी क्रिकेटपटू करु लागले आहेत. आतापर्यंत रोहितनंतर हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व जाईल अशी चर्चा केली जात होती. मात्र ही चर्चा पंड्याची सध्याची कामगिरी पाहता थंड पडली आहे. त्यामुळेच आता संजू सॅमसन भावी कर्णधार म्हणून प्रबळ दावेदार ठरु शकतो याचेच हे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे.
फिरकी गोलंदाजांमध्ये पठाणने रविंद्र जडेजाला पहिली पसंती दर्शवली आहे. या अष्टपैलू खेळाडूबरोबरच पठाणने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला संघात स्थान दिलं आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रवी बिश्नोई आणि विरुण चक्रवर्तीला पठाणने वगळलं आहे.
नक्की पाहा >> 6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं काय
पठाणने आपला संघ निवडताना जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अशरदीप सिंगला वेगवान गोलंदाज म्हणून प्राधान्य दिलं आहे. टी. नटराजन, मयंक यादव, खलिद अहमदयासारख्या वेगवान गोलंदाजांची चर्चा असली तर पठाणने त्यांच्या नावाला बगल दिली आहे.
An #IncredibleStarcast icon, @IrfanPathan has picked his 15-member squad for #TeamIndia for the #ICCT20WorldCup!
Participate in the biggest opinion poll ever, on our social media handles till 1st May, and vote for the players who you believe will get a #VisaToWorldCup.
Stay… pic.twitter.com/NFTh5dWbvh
— Star Sports (@StarSportsIndia) April 24, 2024
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.