IPL 2024 Unique Suggestion By Gautam Gambhir: कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आणि सध्याच्या 2024 च्या इंडियन प्रिमिअर लीगच्या पर्वात केकेआरच्या संघांचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरने एक अजब सल्ला दिला आहे. मागील काही सामन्यांपासून विक्रमी धावसंख्येचे सामने आयपीएलमध्ये पाहायला मिळाल्याने बॅट आणि बॉलचा तोलामोलाच्या सामन्याचा आनंद घेता यावा म्हणून गंभीरने हा सल्ला दिला आहे. यंदाच्या पर्वामध्ये सन रायझर्स हैदराबादच्या संघाने दोन वेळा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळेच गंभीरने आता फलंदाजी आणि गोलंदाजीतील स्पर्धा समान स्तरावर व्हावी यासाठी काय करता येईल याबद्दल भाष्य केलं आहे.
गंभीरने आयपीएलच्या सामन्यांसाठी ज्या कंपनीचे पांढरे बॉल वापरले जातात ते बदलायला हवेत असं म्हटलं आहे. म्हणजेच आयपीएलला बॉल पुरवणारी कंपनी आणि ज्या पद्धतीचे बॉल वापरले जातात ते बदलायला हवेत असं गंभीर म्हणाला आहे. सध्या जे बॉल आयपीएलमध्ये वापरले जातात ते बदलून वेगळ्या कंपनीचे बॉल वापरल्यास गोलंदाजांना चेंडू वळवण्यासाठी फायदा होऊ शकतो. असं झालं तर त्यांना फलंदाजांना अधिक कोड्यात टाकता येईल, असं गंभीरचं म्हणणं आहे.
"जर बॉल निर्मिती करणारी कंपनी 50 ओव्हर टीकाणारा बॉलही बनवून शकत नसले तर दुसऱ्या कंपनीचा विचार केला पाहिजे. बॉल बनवणारी कंपनी बदलून पाहण्यात काहीही चुकीचं नाही. मला हेच कळत नाही की, केवळ कुकुबुरा बॉल वापरण्याचं हे बंधन का घालून घेण्यात आलं आहे," असं गंभीरने '180 नाऊट आऊट' या पॉडकास्टच्या पहिल्याच भागात म्हटलं आहे. गौतम गंभीरचा केकेआरचा संघ 223 वर 6 बाद एवढी मोठी धावसंख्या करुनही राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना 2 विकेट्सने जिंकल्यानंतर त्याने बॉल बदलण्याचा सल्ला दिला आहे.
नक्की वाचा >> Sixes च्या Hat-trick ची धोनीला मोजावी लागतेये मोठी किंमत? हॉटेलमधील 'त्या' Video ने वाढली चिंता
क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनीही असेच मत नोंदवले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या भोगलेंनी ड्युक बॉलचा वापर करायला हरकत नाही असं म्हटलं आहे. या बॉलचा वापर केल्यास फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळेल असं म्हटलं आहे. "मी पुन्हा पुन्हा याचा उल्लेख करेल की, खेळपट्ट्या साथ देत नसतील तर आपल्याला या खेळात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अधिक समतोल राखणं गरजेचं असून त्यासाठी हवेत वळणारा बॉल वापरला पाहिजे. यासाठी ड्युक बॉल कसा राहिल? या बॉलची हवेत हलचाल तुलनेनं अधिक होते. तो हवेत अधिक वळतो त्यामुळे फलंदाजांना आडवे फटके मारणं आव्हानात्मक होतं. यावर तज्ज्ञांनी मत मांडलं तर ते ऐकायला नक्की आवडेल," असं हर्षा भोगलेंनी एक्सवर म्हटलं आहे.