IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वातील 29 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यजमान मुंबई इंडियन्सच्या संघासाठी हा घरच्या मैदानावरील सलग चौथा सामना असणार आहे. तर पाहुणा संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा होम ग्राऊण्डबाहेरील सलग तिसरा सामना असणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिले 3 सामने गमावल्यानंतर मुंबईच्या संघाला लय गवसली आहे. मुंबईच्या संघाने सलग 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे चेन्नईचा संघही पॉइण्ट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी असल्याने मुंबईसाठी घरच्या मैदानावरील ही लढाई फारशी सोपी ठरणार नाही हे निश्चित. विशेष म्हणजे आजच्या सामन्यातील टॉस हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. वानखेडेची खेळपट्टी आणि टॉसचं काय कनेक्शन आहे समजून घेतानाच आज टॉस का महत्त्वाचा ठरणार आहे हे पाहूयात...
वानखेडेच्या मैदानावर आयपीएल सामन्यांमधील सरासरी धावसंख्या ही 170 इतकी आहे. मात्र मुंबई आणि चेन्नईच्या संघाकडे पाहता दोन्ही संघ हा टप्पा सहज काढू शकतात. त्यामुळे आजच्या सामन्यात 180 ते 200 दरम्यानचं किमान लक्ष्य ठेवलं जाईल अशी दाट शक्यता आहे. खेळपट्टीकडून गोलंदाजांना कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नाही. हे फलंदाजांसाठी नंदनवन आहे. दोन्ही संघांकडे तुफान फटकेबाजी करणारे फलंदाज असल्याने मोठी धावसंख्या उभारली जाईल असं मानलं जात आहे.
मुंबईच्या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ही 235 धावांवर 1 विकेट अशी आहे. आरसीबी विरुद्ध मुंबईदरम्यान खेळवण्यात आलेल्या 2015 च्या सामन्यात ही धावसंख्या झाली होती. तर 2008 साली या मैदानात खेळवण्यात आलेला एक सामना सर्वात कमी धावसंख्येचा सामना ठरला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 67 धावांवर तंबूत परतला होता. हा सामना मुंबईविरुद्ध खेळवण्यात आलेला.
आयपीएल सामन्यांत वानखेडेच्या मैदानामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. त्याने या मैदानात 2 हजार 45 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी 925 धावांसहीत सूर्यकुमार यादव आहे. पाचव्या स्थानी 855 धावांसहीत दिनेश कार्तिकचा क्रमांक लागतो. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत लसिथ मलिंगा पहिल्या स्थानी आहे. त्याच्या नावावर या मैदानात 66 आयपीएल विकेट्स आहेत. या यादीमध्ये जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी असून इथे त्याने 45 विकेट्स घेतल्यात.
नक्की वाचा >> MI vs CSK सामन्यात आकडेवारी मुंबईच्या बाजूने पण...; पाहा कशी असेल संभाव्य Playing 11
वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. या मैदानावरील बॉण्ड्री लाइन्स तुलनेनं लहान आहेत. तसेच खेळपट्टी अगदी सपाट असल्याने अधिक धावसंख्येचा सामना अपेक्षित आहे. आज वानखेडेवर चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळू शकते. सामान्यपणे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला कर्णधार प्राधान्य देतात. म्हणजेच या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करण्यास कर्णधारांकडून प्राधान्य दिलं जातं. मुंबई आणि चेन्नईच्या संघाने अनेकदा मोठ्या धावसंख्या सहज गाठल्या आहेत. त्यामुळेच नाणेफेक जिंकणारा कर्णधार गोलंदाजीला प्राधान्य देईल यात शंका नाही. या मैदानावर झालेल्या शेवटच्या आयपीएल सामन्यामध्ये मुंबईच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला 7 विकेट्सने पराभूत केलं होतं.
प्रथम फलंदाजी करुन सामने जिंकण्याचं या मैदानावरील प्रमाण 45.54 टक्के इतकं आहे तर धावांचा पाठलाग करत सामना जिंकण्याचं प्रमाण हे 54.46 टक्के इतकं आहे. वानखेडेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या 112 सामन्यांपैकी 51 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्यांनी जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करताना तब्बल 61 वेळा संघांना यश आलं आहे. या मैदानावर सामान्यपणे प्रत्येक ओव्हरला सरासरी 8.52 धावा होतात. तर दर 27 धावांनंतर या मैदानावर विकेट पडते असं सरासरी आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यातही नाणेफेक म्हणजेच टॉस फार महत्त्वाचा ठरणार आहे. टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.