IPL 2024 SunRisers Hyderabad vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये 27 मार्च रोजी झालेल्या सामन्यामध्ये यजमान संघाने 31 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये धावांचा, षटकारांचा आणि विक्रमांचा पाऊस पडला. बुधवारी झालेल्या या सामन्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी या सामन्यानंतर खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. खरं तर हैदराबादमधील मैदानातील खेळपट्टी इतकी सपाट होती की जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्ससारख्या गोलंदाजांचाही चांगलाच समाचार घेतला. मुंबई आणि हैदराबादच्या संघाने एकूण 523 धावा कुटल्या. या सामन्यामध्ये विक्रमी 38 षटकार लगावण्यात आले. कोणत्याही टी-20 सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून 500 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र या सामन्यातील धावांची संख्या पाहून पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आयपीएलची खिल्ली उडवली आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनैद खानने खेळपट्ट्यांवरुन तसेच मैदानाच्या आकारावरुन आयपीएल म्हणजेच पर्यायाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची खिल्ली उडवली आहे. "सपाट खेळपट्टी, कमी अंतरावर असलेली सीमारेषा, मैदानाच्या बाहेरील भागातून वेगाने पळणारा चेंडू... या साऱ्यालाच आयपीएल म्हणतात. तब्बल 278 चं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे," असं जुनैदने 27 मार्च रोजी रात्री 9 वाजून 27 मिनिटांनी #MIvsSRH आणि #IPL2024 हॅशटॅग वापरुन केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Flat pitches, small boundaries, quick outfield. This is called IPL
A target of 278 #MIvsSRH #IPL2024— Junaid khan (@JunaidkhanREAL) March 27, 2024
एवढ्या मोठ्या धावसंथ्येचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने काही काळासाठी हैदराबादच्या संघाला धडकी भरवली होती. मुंबईच्या संघानेही तोडीस तोड फलंदाजी केली. मात्र ते लक्ष्यापासून 32 धावा दूर राहिले. सामन्याचा निकाल लागल्यानंतरही जुनैदने पोस्ट केली. "सर्व श्रेय खेळपट्टीला द्यायला हवं. 40 ओव्हरमध्ये 523 धावा कुटल्या आणि केवळ 8 विकेट्स पडल्या," असं जुनैदने म्हटलं आहे. "हे खरोखरचं क्रिकेट आहे की दांडीच्या मदतीने खेळलं जाणारं क्रिकेट?" असा सवालही जुनैदने विचारला आहे.
नक्की वाचा >> IPL 2024 Points Table मध्ये राजस्थानचा रॉयल कारभार! मुंबईचं रँकिंग पाहून बसेल धक्का
Credit goes to the wicket. 523 runs in just 40 overs with only 8 wickets fallen.
Is this actual cricket or is it stick cricket??#MIvsSRH#IPL2024
— Junaid khan (@JunaidkhanREAL) March 27, 2024
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 277 धावा केल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनीही तुफान फलंदाजी केली. कर्णधार हार्दिक पंड्या वगळता मुंबईच्या जवळपास सर्वच फलंदाजांनी 200 च्या सरासरीने फटकेबाजी करत धावा केल्या. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 20 तर मुंबई इंडियन्सने 18 षटकार लगावले. सनरायझर्सकडून ट्रॅव्हीस हेडने 24 बॉलमध्ये 62 धावा आणि अभिषेक नायरने 23 बॉलमध्ये 63 धावांच्या तुफान खेळी केल्या. हेनरीच कार्ल्सननेही 34 बॉलमध्ये 80 धावा करत हैदराबादच्या संघाला 11 वर्षांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा 263 धावांचा सर्वाधिक स्कोअरचा विक्रम मोडीत काढण्यास हातभार लावला.
नक्की वाचा >> हार्दिक पंड्यासाठी Warning! 'मुंबईमध्ये खेळशील तेव्हा...'; रोहितच्या नावाने डिवचण्यावरुन इशारा
मुंबईच्या संघाने या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा बराच प्रयत्न केला पण त्यांना 20 ओव्हरमध्ये केवळ 246 धावा करता आल्या. मुंबईचा या पर्वातील हा दुसरा पराभव ठरला. यापूर्वी मुंबईच्या संघाने गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना गमावला होता. मुंबईला 9 सामन्यानंतर एकही सामना जिंकता आलेला नाही.