IPL 2024 Replacement For MS Dhoni: इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वासाठीचा लिलाव लवकरच पार पडणार आहे. या स्पर्धेचं 17 वं पर्व पुढील वर्षी खेळवलं जाणार आहे. आयपीएलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला मैदानात पाहण्याची संधी मिळणार आहे. 42 वर्षीय धोनीसाठी यंदाचं आयपीएल हे शेवटचं असेल अशी दाट शक्यता व्यक्ती केली जात आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवेळा चषक जिंकला आहे. मात्र धोनी निवृत्त झाल्यानंतर चेन्नईची धुरा कोणाकडे सोपवली जाईल असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. धोनीला पर्याय म्हणून तितकाच दमदार कर्णधाराचा शोध सीएसकेकडून सुरु आहे.
एकीकडे सीएसके धोनीचा पर्याय म्हणून कोणाचा समावेश करुन त्याला ग्रूम करता येईल याबद्दलची चाचपणी केली जात असतानाच भारताचा माजी विकेटकीपर दिप दासगुप्ताने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा विचार सीएसके करु शकते असं म्हटलं आहे. मागील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ऋषभ पंतचा उत्तराखंडमध्ये भीषण कार अपघात झाला होता. तेव्हापासून पंत सामन्यासाठी मैदानात उतरलेला नाही. त्याच्यावर अनेक शस्त्रक्रीया झाल्या असून तो या दुखापतीमधून सावरत आहे. मात्र मागील काही महिन्यात पंतच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा आहे. तो सरावासाठीही मैदानात उपस्थित असल्याचं दिसतं. त्यामुळेच पंत 2024 साली आयपीएलमध्ये खेळताना दिसेल, अशी दाट शक्यता आहे.
"त्यांनी (सीएसकेने) 2025 च्या आयपीएलपर्यंत ऋषभ पंतला संघात घेतल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ऋषभ पंत हा एम. एस. धोनीचा निकटवर्तीय आहे. ते बराच काळ एकत्र खेळले आहेत. त्या दोघांमधील कनेक्शन आणि ऋषभ ज्या पद्धतीने विचार करतो ते धोनीशी साधर्म्य साधणारं आहे. दोघेही फार आक्रमक आणि सकारात्मक विचार करतात. तो कायमच विजयाबद्दल बोलत असतो," अशी पोस्ट दासगुप्ता यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन केली आहे.
Will Rishabh Pant move to CSK? Here’s what I feel. #deeppoint #cricket #indiancricketer #ipl #trending #viral #csk #dc pic.twitter.com/tgZQ9D3KRp
— Deep Dasgupta (@DeepDasgupta7) December 2, 2023
2024 च्या सरावासाठी ऋषभ पंत अजून दिल्लीच्या संघाबरोबर सराव करत नसल्याचं सौरव गांगुलीने यापूर्वी स्पष्ट केलं होतं. "तो (पंत) आता अधिक चांगल्या स्थितीत आहे. तो आयपीएलच्या पुढील पर्वात खेळेल," असं गांगुलीने कोलकात्यामध्ये 10 नोव्हेंबर रोजी म्हटलं होतं. "तो इथे (कोलकात्यामध्ये) सराव करत नसून सरावासाठी तो आमच्याबरोबर मैदानात उतरण्यास आणखी थोडा खाळ शिक्लक आहे. तो जानेवारीपर्यंत अधिक तंदरुस्त होईल," असं गांगुलीने सांगितलेलं. "आम्ही संघाबरोबर चर्चा करत आहो. तो कर्णधार आहे. त्यामुळे आगामी लिलावावरुन बरीच चर्चा सुरु आहे. त्यासाठीच तो कोलकात्यामध्ये आला आहे. संघाबद्दलच्या काही गोष्टी निश्चित केल्या जातील," असं गांगुलीने सांगितलेलं.