IPL 2024 CSK 17 Year Old Bowler Viral Video Dhoni: फळाची अपेक्षा न करता कर्म करत जा असं म्हटलं जातं. कष्ट करणाऱ्याचं नशीब कसं आणि कधी पलटेल सांगता येत नाही. श्रीलंकेतील एका 17 वर्षीय तरुण गोलंदाजाबरोबर असेच काहीसे घडले आहे. घरगुती क्रिकेटमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यासाठी धडपडणाऱ्या या गोलंदाजाच्या एका यॉर्करने त्याचं नशीब पालटलं आहे. या एका यॉर्करने तरुणाच्या करिअरने गरुड भरारी घेतली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
या 17 वर्षीय तरुणाने स्थानिक स्पर्धेमध्ये टाकलेल्या यॉर्करचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा यॉर्कर पाहून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीही त्याच्या गोलंदाजीवर फिदा झाला. धोनीने या तरुण गोलंदाजाला थेट श्रीलंकेवरुन भारतात बोलावलं. यंदाच्या आयपीएलमध्ये हा तरुण चेन्नई सुपर किंग्सच्या संघाबरोबर नेट्समध्ये सराव करत आहे. चेन्नईच्या संघाबरोबर सध्या नेट्समध्ये घाम गाळणाऱ्या तरुणाचं नाव आहे कुलादास मथुलान!
कुलादासचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ज्यात त्याने टाकलेल्या अचूक यॉर्करने फलंदाजाचा मिडल स्टम्प उडवला होता. कुलादासने टाकलेला हा चेंडू फलंदाजाला चकवा देत थेट स्टम्पला आदळला. हा यॉर्कर इतका परफेक्ट होता की फलंदाजाचं संतुलन बिघडलं आणि तो खाली कोसळला. हा व्हिडीओ तुम्हीही पाहू शकता...
17 year old Jaffna slinga “Kugadas Mathulan” is currently at Chennai as M s Dhoni wanted to have a look at his Bowling. He wil be a net bowler for @ChennaiIPL during the IPL 2024. pic.twitter.com/3lHMzcHSJd
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) March 14, 2024
कुलादासचा हा व्हिडीओ एम. एस. धोनीने पाहिला आणि हा मुलगा त्याच्या मनात भरला. त्याने कुलादासला भारतात बोलावून सीएसकेच्या नेट्स बॉलरच्या टीममध्ये सहभागी करुन घेतलं आहे. कुलादासचाची सर्वात खास बाब म्हणजे त्याच्या गोलंदाजाची शैली ही लसिथ मलिंगासारखी आहे. मलिंगा सध्याच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा प्रशिक्षण म्हणून काम करत आहे. यापूर्वीही चेन्नईच्या संघाने श्रीलंकेच्या माथेशा पाथीराणाला संघात संधी दिली होती. माथेशा पाथीराणाने मागील पर्वामध्ये चेन्नईसाठी भन्नाट गोलंदाजी करुन पाचव्यांदा संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. त्याने 12 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, 2 मार्चपासून चेन्नई सुपर किग्जच्या सराव शिबिराची सुरुवात झाली आहे. या सराव शिबीरामध्ये ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी आणि प्रशांत सोलंकीसारखे खेळाडू सहभागी झाले आहेत. स्वत: धोनीही सध्या नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे. यंदाच्या पर्वातील पहिला सामनाच चेन्नई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये होणार आहे. 22 मार्च रोजी यंदाच्या आयपीएलमधील हा पहिला सामना होणार आहे.