IPL 2024 Unavailable Players List: भारत आणि इंग्लंडदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची. आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरु होतेय. पण त्याआधीच अनेक संघांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल नऊ खेळाडू या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami), मार्क वूड, जेसन रॉय आणि हॅरी ब्रूक या स्टार खेळाडूंचाही समावेश आहे. काही खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगामाला मुकणार आहेत. तर काही खेळाडू काही सामने खेळू शकणार नाहीत.
स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
यातले काही खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. तर काही खेळाडूंनी व्यस्त वेळापत्रकामुळे स्पर्धेतून नाव मागे घेतलं आहे. काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणाने आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे.
गुजरात संघातून दोन खेळाडू बाहेर
आयपीएलच्या सतराव्या हंगामात सर्वात मोठा धक्का बसला आहे तो गत उपविजेत्या गुजरात टायटन्सला (Gujrat Titans). संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी पायाच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडलाय. एकदिवसीय विश्वचषकानंतर मोहम्मद शमी एकही आंतरराष्ट्रीय साना खेळलेला नाही. टी20 विश्वचषकातही तो खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू वेडनेही गुजरातला झटका दिला आहे. पहिल्या एक किंवा दोन सामन्यात वेड खेळू शकणार नाही. मॅथ्यू वेड स्थानिक स्पर्धा शेफील्ड शील्ड टूर्नामेंट खेळणार आहे. त्यानंतर तो गुजरात टायटन्समध्ये सहभागी होणार आहे.
व्यस्त वेळापत्रकामुळे 'हा' स्टार खेळाडू मुकणार
केएल राहुल नेतृत्व करत असलेल्या लखनऊ सुपर जायटंसलाही याचा फटका बसलाय. इंग्लंडचा वेगावन गोलंदाज मार्क वूड आयपीएलमध्ये खेळणार नाहीए. जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी मार्क वूड तयारी करतोय. इंग्लिश क्रिकेट बोर्डाच्या आदेशानंतर मार्क वूडने आयपीएलमधून आपलं नाव मागे घेतलं आहे.
सलग दुसऱ्या हंगमातून बाहेर
राजस्थान रॉयल संघाचा प्रमुख गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा सलग दुसऱ्या हंगामातही खेळणार नाहीए. दुखापतीमुळे प्रसिद्ध कृष्णा आयपीएल खेळू शकणार नाहीए. 2022 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने प्रसिद्ध कृष्णावर तब्बल 10 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण गेले सलग दोन हंगाम तो राजस्थान रॉयल्समधून खेळलेला नाही.
केकेआरमधून 2 खेळाडू बाहेर
कोलकाता नाईट रायडर्ससंघातून खेळणारे इंग्लंडेच जेसन रॉय आणि गस एटिंकसनने सुद्धा आयपीएलमधून आपलं नाव मागे घेतलं आहेत. सलामीवीर जेसन रॉय वैयक्तिक कारणामुळे आयपीएल खेळणार नाहीए. तर एटकिंसन टी20 विश्वचषकामुळे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. जेसन रॉयच्या जागी केकेआरने फिल साल्ट तर एटकिंसनच्या जागी श्रीलंकेच्या दुश्मंथा चमीराला संधी देण्यात आली आहे.
धोनी-पंतलाही धक्का
न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर डेवॉन कॉन्वेने एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का दिला आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे कॉन्वे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे अद्याप सीएसकेने स्पष्ट केलं आहे. ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्समधून इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुक खेळणार नाहीए. दिल्ली कॅपिटल्सने ब्रूकवर 4 कोटी रुपयांची बोली लावली होती.
मुंबई इंडियन्सलाही फटका
टी20 क्रिकेटचा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवनेही मुंबई इंडियन्संच टेन्शन वाढवलं आहे. सूर्यकुमार यादव नुकताच शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार खेळू शकणार नसल्याचं सांगितलं जात आहे.