IPL 2023 : RCB चे खेळाडू हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार, नेमकं कारण काय?

RCB Vs RR : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. आजच्या सामन्यात महत्त्वाचे म्हणजे नेहमी लाल आणि काळ्या रंगाच्या जर्सीत दिसणारे आरसीबीचे खेळाडू आज हिरव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. यामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊया...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 23, 2023, 02:46 PM IST
IPL 2023 : RCB चे खेळाडू हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार, नेमकं कारण काय?  title=
RCB in Green Jersey

RCB in Green Jersey : आयपीएलच्या (IPL 2023) 2023 च्या 32 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB Vs RR) संघ आमनेसामने येणार आहे. आजचा सामना विराट कोहलीच्या आरसीबीसाठी (RCB) थोडा खास असणार आहे, कारण आरसीबीचा संघ आज हिरवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (23 एप्रिल 2023) दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होईल.  

आरसीबी हिरवी जर्सी का घालणार?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हिरवी जर्सी का घालणार? सामन्यात हिरवी जर्सी घालण्यामागील कारण खूप मनोरंजक आहे. कारण RCB हिरवी जर्सी घालून गो ग्रीन मोहिमेला सपोर्ट करते. या माध्यमातून ती रोपे लावून हिरवाई वाढवण्याचा संदेश देते. RCB ने 2011 च्या हंगामात पहिल्यांदा हिरवी जर्सी घालण्यास सुरुवात केली होती. 2011 मध्ये RCB ने निर्णय घेतला होता, आयपीएलच्या प्रत्येक हंगामात त्यांच्या घरच्या मैदानावर लाल रंगाऐवजी हिरवी जर्सी घालून एक सामना खेळणार. लोकांमध्ये स्वच्छ आणि हरित वातावरण निर्माण करण्यासाठी आरसीबीच्या संघाने हा उपक्रम हाती घेतला आहे. 'गो ग्रीन' उपक्रमाचा एक भाग म्हणून संघाने ही हिरव्या रंगाची जर्सी परिधान केली आहे.

वाचा : बंगळुरू की राजस्थान? कोणाचं पारड जड? जाणून घ्या Playing 11

जर्सीमध्ये संघाची आकडेवारी...

2011 पासून RCB संघाने प्रत्येकी हंगामात एकदा हिरवी रंगाची जर्सी घालून एक तरी सामना खेळतो. मात्र या रंगाची जर्सी आरसीबीला फारशी लकी ठरत नाही. कारण आतापर्यंतची आकडेवारी पाहता या जर्सीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ जेव्हा-जेव्हा मैदानात उतरला आहे, तेव्हा बहुतेक वेळा संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या जर्सीमध्ये संघाने आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामने हरले आहेत आणि केवळ 3 सामने जिंकले आहेत.  तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

कचऱ्यापासून जर्सीची निर्मिती

स्टेडियममध्ये साचलेल्या कचऱ्यापासून यंदा आरसीबीची हिरव्या रंगाची जर्सी बनवण्यात आली आहे. आरसीबीच्या पहिल्या सामन्यातून 9047.6 किलो कचरा जमा झाला ज्यामध्ये 19,488 पाण्याच्या बाटल्या वापरण्यात आल्या. अंदाजानुसार, प्रत्येक खेळानंतर सरासरी आठ टन सुका कचरा, अन्न कचरा आणि इतर पुनर्वापर करण्यायोग्य कचरा तयार होतो.