मुंबई: IPL 2021 हंगामाला सुरुवात होण्याआधी 8 संघांना पेचात टाकणारा एक निर्णय समोर आला आहे. या निर्णयाचं उल्लंघन केल्यास टीम अडचणीत येण्याची शक्यता आहे. BCCIने IPLमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांच्या वेळेबाबत कठोर निर्णय घेतला आहे. वेळेबाबत प्रत्येक संघाला ई-मेलद्वारे ताकीद देण्यात आली आहे.
BCCIच्या नव्या नियमात काय म्हटलं आहे?
IPL स्पर्धा वेळेत संपवण्यासाठी नियम कठोर केले आहेत. इतकच नाही तर वेळेवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक संघाला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. यासाठी 85 मिनिटांमध्ये सामना जवळपास संपायला हवा. 5 मिनिटांपैकी प्रत्येकी अडीच मिनिटं ही दोन्ही संघासाठी टाइम आऊटसाठी दिली जाणार आहेत.
यापूर्वी सामना नियोजित वेळेपेक्षा थोडा पुढे गेला तर चालत होतं. याचाच अर्थ असा की 90 व्या मिनिटाला 20वी ओव्हर सुरू झाली तर चालू शकणार होतं. मात्र बदललेल्या नव्या नियमानुसार आता 85 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे.
निर्धारित वेळेवर जर ओव्हर पूर्ण झाली नाही तर प्रत्येक ओव्हरसाठी 4 मिनिटं 15 सेकंद दिली जाणार आहेत. वेळेवर नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी ही चौथ्या अंपायरवर सोपवली जाणार आहे. जर फलंदाजांनी वेळ वाया घालवला आणि गोलंदाजांनी आपल्या वेळेत ओव्हर पूर्ण केले नाहीत तर गोलंदाजी टीम ज्या वेळी फलंदाजीसाठी येईल तेव्हा त्यांच्या वेळेत कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या निर्णयामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.