अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा पराभव करून या स्पर्धेतील पहिला विजय मिळविला. या विजयाच्या मागे लेगस्पिनर राशिद खानच्या शानदार गोलंदाजीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राशिद खानने आपल्या दिवंगत पालकांना समर्पित केला.
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने चार विकेट गमवत 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघ 15 धावांनी मागे पडला. राशिदने फिरकीच्या जोरावर 3 विकेट घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर तो म्हणाला की, 'मागील दीड वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. प्रथम मी माझ्या वडिलांचा आणि तीन ते चार महिन्यांपूर्वी आईला गमावले. ती माझी सर्वात मोठी फॅन होती. हा पुरस्कार दोघांचा आहे. मला जेव्हा जेव्हा एखादा पुरस्कार मिळायचा तेव्हा ती रात्रभर माझ्याशी चर्चा करायची.'
तो म्हणाला की, 'मला चांगली कामगिरी करण्यासाठी दबाव मी कधी घेत नाही. मी शांत खेळतो. कर्णधाराने नेहमी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मला माझ्यानुसार गोलंदाजी करण्याची संधी दिली आहे.'
सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने म्हटले की, मिशेल मार्श दुखापतग्रस्त झाल्याने त्याची गोलंदाजीची कमतरता दूर करणे आवश्यक होती. अभिषेकने चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही डेथ ओव्हर्स गोलंदाजीवर कठोर परिश्रम घेतले. आज प्रत्येकाने चांगली कामगिरी केली'.