मुंबई : १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच आयपीएलच्या टीमना मोठा धक्का लागला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाची टीम इंग्लंडमध्ये १ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.
आयपीएल सुरु व्हायच्या ३ दिवस आधीच इंग्लंड-ऑस्ट्रेलियाची सीरिज संपणार असली, तरी कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सुरुवातीच्या काही मॅचना मुकावं लागणार आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १७ किंवा १८ सप्टेंबरला युएईमध्ये पोहोचतील. यानंतर आयपीएलच्या नियमानुसार पुढचे ६ दिवस या खेळाडूंना क्वारंटाईन केलं जाईल. तसंच पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी प्रत्येक खेळाडूची कोरोना टेस्ट केली जाईल. सातव्या दिवशी खेळाडूंच्या तिन्ही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या तर खेळाडू बायो-बबलमध्ये जातील. बायो-बबल म्हणजे टीमचा बाहेरच्या जगाशी संपर्क तोडण्यात येईल. टीममध्ये कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी बायो-बबल पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
आयपीएलच्या या नियमावलीमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या दोन ते तीन मॅचना मुकण्याची शक्यता आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सीरिजचा सर्वाधिक फटका हा राजस्थानला बसणार आहे. राजस्थानच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जॉस बटलर हे खेळाडू नसतील. तर कोलकात्याला इओन मॉर्गन आणि पॅट कमिन्सशिवाय सुरुवातीचे सामने खेळावे लागतील. पॅट कमिन्सला कोलकात्याने सर्वाधिक बोली लावून विकत घेतलं आहे.
हैदराबादच्या टीमलाही डेव्हिड वॉर्नरशिवाय सुरुवातीच्या मॅच खेळाव्या लागणार आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या गैरहजेरीत हैदराबादची टीम केन विलियमसनला कर्णधारपद देऊ शकते. विराटच्या बंगळुरू टीममध्येही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच सुरुवातीला दिसणार नाही. पंजाबलाही ग्लेन मॅक्सवेलशिवाय सुरुवातीला खेळावं लागेल.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सीरिजचा मुंबईच्या टीमला फटका बसणार नाही, कारण क्रिस लिन आणि नॅथन कुल्टर-नाईल हे मुंबईचे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या टीमचा हिस्सा नाहीत.