मुंबई : २०१९ साली होणारी आयपीएल भारतातच होणार आहे यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. आयपीएलची समिती आणि सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं आयपीएल भारतातच होईल याबद्दलचा निर्णय घेतला आहे. २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. भारतात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकींमुळे आयपीएल दक्षिण आफ्रिका किंवा युएईमध्ये होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण बीसीसीआयनं एक प्रसिद्धी पत्रक काढून आयपीएल भारतातच होईल, असं सांगितलं आहे.
केंद्र आणि राज्यातल्या संबंधित सरकारी संस्थांशी आमचं बोलणं झालं आहे. यानंतर आम्ही आयपीएलचा १२वा सिझन भारतात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, असं बीसीसीआयच्या या प्रसिद्धी पत्रकात लिहिण्यात आलं आहे. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्याआधी बीसीसीआयची प्रशासकीय समिती संबंधित सगळ्यांशी चर्चा करणार आहे.
ऐन निवडणुकींच्या तोंडावर आयपीएल होत असल्यामुळे नेहमीच्या होम-अवे फॉरमॅटमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. याआधी २००९ सालच्या निवडणुकींमुळे संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलं होतं. तर २०१४ सालीही निवडणुकींमुळेच आयपीएलचा पहिला भाग युएईमध्ये आणि दुसरा भाग भारतात खेळवण्यात आला होता.
याआधी आयपीएल एप्रिल महिन्यामध्ये सुरु व्हायची. पण यावर्षी ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार असल्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे ही स्पर्धा वेळेआधी खेळवण्यात येणार आहे.