IPL 2019 : ऋषभ पंतची एक चूक आणि धोनीने लगावले दोन सिक्स

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ८० रननी दणदणीत विजय झाला आहे.

Updated: May 2, 2019, 07:31 PM IST
IPL 2019 : ऋषभ पंतची एक चूक आणि धोनीने लगावले दोन सिक्स  title=

चेन्नई : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ८० रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच चेन्नईने पॉईंट्स टेबलमध्ये आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. चेन्नईने ठेवलेल्या १८० रनचा पाठलाग करताना दिल्लीची टीम फक्त ९९ रनवर ऑल आऊट झाली. या मॅचमध्ये धोनीने टीममध्ये पुनरागमन केलं आणि चेन्नईची टीम पुन्हा विजयाच्या पटरीवर आली. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीने दोन सिक्स मारून चेन्नईचा स्कोअर १८० पर्यंत पोहोचवला. पण या दोन सिक्स मारण्यात ऋषभ पंतने मदत केल्याचं धोनी म्हणाला.

या मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगला बोलावलं होतं. चेन्नईची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. सुरेश रैनाने ५९ रन, डुप्लेसिसने ३९ रन आणि जडेजाने २५ रनची खेळी केली. पण धोनीने २२ बॉलमध्ये ४४ रन काढून चेन्नईला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.

१९वी ओव्हर संपली तेव्हा चेन्नईचा स्कोअर १६४ रन होता. तीन बॉलनंतर धोनीला एक रन घ्यावी लागली. दुसऱ्या बाजूला अंबाती रायुड होता, पण स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी धोनी आग्रही होता. दिल्लीचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टने चौथा बॉल वाईड टाकला. यावेळी धोनीने चतुराई दाखवून एक रन घेतली आणि स्वत:कडे स्ट्राईक घेतला. पंतला धोनीला रन आऊट घेता आलं नाही आणि पुढच्या दोन बॉलवर धोनीने सिक्स लगावले.

सिक्स मारण्यासाठी एक रन न घेण्याचा धोका का पत्करलास? असा सवाल समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला विचारला. तेव्हा 'रायुडू त्यावेळी नुकताच बॅटिंग करायला आला होता. त्याच्यासाठी शॉट मारणं मुश्कील होतं. ऋषभ पंतनेही माझी मदत केली. त्याने ग्लोव्हज काढले नाहीत, म्हणून मला एक रन काढता आली,' असं धोनी म्हणाला.

वाईड बॉलवर धोनीने रायुडूला चोरटी रन घ्यायला लावली तेव्हा पंतच्या दोन्ही हातात ग्लोव्हज होते. दोन्ही हातात ग्लोव्हज असताना विकेट कीपरला रन आऊट करणं कठीण होतं. धोनीने पंतची हीच चूक हेरुन एक रन काढली आणि पुढच्या दोन बॉलला सिक्स मारले. धोनी हा विकेट कीपिंग करताना शेवटच्या काही ओव्हरमध्ये बहुतेकवेळा एकाच हातात ग्लोव्हज घालतो. प्रतिस्पर्धी बॅट्समन अशाप्रकारे रन काढण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे धोनीला ग्लोव्हजशिवाय रन आऊट करणं सोपं जातं.

लीग स्टेजमधली चेन्नईची घरच्या मैदानातली ही शेवटची मॅच होती. शेवटच्या मॅचमध्ये विजय मिळवून देत चेन्नईने त्यांच्या चाहत्यांना गिफ्ट दिलं. आता चेन्नईचा पुढचा सामना पंजाबशी मोहालीमध्ये होणार आहे. चेन्नईची टीम ही सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जर चेन्नईची टीम पहिल्या दोन क्रमांकावर शेवटपर्यंत कायम राहिली, तर त्यांना प्ले ऑफचा सामना चेन्नईमध्ये खेळायला मिळेल.