जयपूर : राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा ४ विकेटने विजय झाला. दिल्लीच्या या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्येही मोठा उलटफेर झाला आहे. या विजयामुळे दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारी चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. या मॅचमुळे मुंबईचेही नुकसान झालं आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणारी मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.
दिल्लीने आत्तापर्यंत खेळलेल्या ११ मॅचपैकी ७ मॅचमध्ये विजय मिळवला आणि ४ मॅचमध्ये पराभव पत्करला. दिल्लीच्या खात्यात आता १४ पॉईंट्स आहेत. तर चेन्नईने १०पैकी ७ मॅच जिंकल्या आणि ३ मॅच गमावल्या. चेन्नईच्या खात्यात दिल्लीप्रमाणेच १४ पॉईंट्स असले तरी चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईचा १०पैकी ६ मॅचमध्ये विजय आणि ४ मॅचमध्ये पराभव झाला. यामुळे मुंबईकडे १२ पॉईंट्स आहेत.
राजस्थानने दिलेले १९२ रनचे आव्हान दिल्लीने शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. दिल्लीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १९१ रन केले. रहाणेने ६३ बॉलमध्ये १०५ रन केल्या. यामध्ये ११ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.
राजस्थानने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. शिखर धवनने २७ बॉलमध्ये ५४ रन केले. तर पृथ्वी शॉने ३९ बॉलमध्ये ४२ रनची खेळी केली. धवन आणि पृथ्वी शॉ या ओपनरनी दिल्लीला ७ ओव्हरमध्येच ७२ रनची पार्टनरशीप करून दिली. यानंतर दिल्लीने २ विकेट झटपट गमावल्या. मग ऋषभ पंतने ३६ बॉलमध्ये ७८ रन केले. ऋषभ पंतने ६ फोर आणि ४ सिक्स मारले.