बुमराहच्या डोळ्याला नेमकं काय झालं? प्रशिक्षक महेला जयवर्धनेनं सांगितलं

यंदाच्या आयपीएलमधल्या मुंबईच्या पहिल्याच मॅचवेळी जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Updated: Apr 4, 2019, 11:04 PM IST
बुमराहच्या डोळ्याला नेमकं काय झालं? प्रशिक्षक महेला जयवर्धनेनं सांगितलं title=
फोटो सौजन्य : ट्विटर

मुंबई : यंदाच्या आयपीएलमधल्या मुंबईच्या पहिल्याच मॅचवेळी जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली होती. वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून बुमराहच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट टीमचे सदस्य, निवड समिती आणि क्रिकेट रसिकांची भीती वाढली होती. पण बुमराहला झालेली ही दुखापत फारशी गंभीर नव्हती. यानंतरच्या पुढच्या सगळ्या मॅचमध्ये बुमराह खेळला.

खांद्याच्या दुखापतीची चिंता मिटते ना मिटते तोच बुधवारी चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये बुमराहचा उजवा डोळा लाल दिसत होता. याचबरोबर बुमराहचा उजवा डोळा आणि डोळ्याच्या खालचा भागही सुजलेला होता. मंगळवारी मुंबईची टीम सराव करत असताना बॉल बुमराहच्या डोळ्याच्या खाली लागला. यामुळे बुमराहला दुखापत झाली आणि त्याचा डोळा लाल झाला आणि डोळ्याच्या खाली गालाला सूज आली. मुंबई टीममधल्या डॉक्टरांनी बुमराहवर उपचार केले, त्यामुळे तो चेन्नईविरुद्धची मॅच खेळण्यासाठी फिट झाला. ज्या दिवशी दुखापत झाली होती त्यादिवशी बुमराहच्या डोळ्यावर आणि गालावर मोठ्याप्रमाणावर सूज होती.

बुमराहला झालेल्या या दुखापतीची माहिती मुंबई टीमचा प्रशिक्षक महेला जयवर्धने याने दिली आहे.

वर्ल्ड कपसाठी जसप्रीत बुमराह हा भारताचा हुकमी एक्का आहे. आयपीएलमध्येही बुमराह मुंबईच्या टीमचं प्रमुख अस्त्र आहे. यंदाच्या मोसमातल्या ४ मॅचमध्ये बुमराहने ७.०२च्या इकोनॉमी रेटने ४ विकेट घेतल्या आहेत. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये बुमराहला एकही विकेट घेता आली नाही, तरी त्याने ४ ओव्हरमध्ये फक्त २७ रन दिले.

डोळ्याला दुखापत झालेली असतानाही बुमराहने त्याच्या ४ ओव्हर पूर्ण केल्या. यामुळे बुमराहची दुखापत फार गंभीर नसल्याचं दिसतंय. चेन्नईविरुद्ध ३७ रनने विजय झाल्यामुळे मुंबईला २ पॉईंट मिळाले.