नवी दिल्ली : २०१२ मध्ये आपल्या नेतृत्वात अंडर १९ वर्ल्डकप जिंकून देणारा उन्मुक्त चंद सध्या चांगलाच नाराज आहे. आयपीएलच्या लिलावात एकाही टीमने त्याच्यवर बोली न लावल्याने तो नाराज झाला आहे. उन्मुक्तची बेस प्राईझ २० लाख रूपये होती.
एकवेळ अशी होती की, २४ वर्षीय उन्मुक्तला विराट कोहलीचा उत्तराधिकारी मानलं जात होतं. पण तो अपेक्षांचं ओझं वाहू शकला नाही. तो म्हणाला की, ‘मला जास्त टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळेच आयपीएलच्या एकाही टीममध्ये मी नाहीये’.
दिल्लीचा टॉप ऑर्डर फलंदाज उन्मुक्तने शाळेत असतानाच रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं होतं. त्याने चौथ्याच सामन्यात शतक लगावलं होतं. नंतर त्याने २०११ आयपीएलमध्ये दिल्लीसाठी खेळणं सुरू केलं होतं. आयपीएल ६ मध्ये तो राजस्थानकडून खेळू लागला आणि नंतर मुंबई टीममध्ये गेला. मात्र जास्त सामन्यात त्याला बसूनच रहावे लागले. त्याला २०११ मध्ये दोन, २०१२ मध्ये दोन, २०१३ मध्ये ९, २०१४ मध्ये एक, २०१५ मध्ये ६ आणि २०१६ मध्ये एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.
आयपीएलमध्ये निवड न झाल्याने तो म्हणाला की, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जास्त टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. फायनलमध्ये त्याने स्कोर केला होता पण तो कमी होता. त्यामुळे तो विकला गेला नाही.
तो म्हणाला की, आयपीएलमध्ये टीममध्ये स्वत:ची रणनिती असते आणि त्यानुसारच खेळाडूंची निवड करत असते. असेही असू शकते की, मी त्यांच्या रणनितीमध्ये फिट बसत नसेल. दिल्ली आणि राजस्थानसाठी मी रन्स केले होते. पण आता त्यांच्या सेटअपमध्ये माझ्यासाठी जागा नसेल.