Injured Hardik Pandya ODI Captaincy: रोहित शर्माऐवजी मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी हार्दिक पांड्याला मिळाल्याने लाखो फॅन्स नाराज झाले आहेत. पांड्याऐवजी रोहित शर्मा बेस्ट कॅप्टन आहे, असे फॅन्सचे मत आहे. त्यामुळे अनेकांनी मुंबई इंडियन्सचे सोशल मीडिया अकाऊंट अनफॉलो केले. आता टीम इंडियाच्या कॅप्टन्सीवरुनदेखील उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन बनणे ही हार्दिक पांड्याची 'महत्वकांक्षा' असल्याचे म्हटले जाते. पण यामध्ये केएल राहुलचे आव्हान दिसत आहे.
अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीमुळे पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा डाव स्वस्तात आटोपून भारताने अवघ्या 100 चेंडूत लक्ष्य गाठले. या विजयासह संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात अनेक विक्रम झाले असले तरी सिनीअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाची कमान सांभाळणाऱ्या केएल राहुलने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता पिंक वनडे जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. एवढेच नाही तर कर्णधार म्हणून त्याचा हा सलग 10वा विजय आहे. भारतीय संघात बदलत्या परिस्थितीमध्ये राहुलची कर्णधारपदी नियुक्ती हा हार्दिक पांड्याच्या 'महत्त्वाकांक्षेला' धक्का मानला जात आहे.
एकदिवसीय विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्म असूनही, रोहित शर्मा आणि विराट कोहली काही महिन्यांनंतर होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद हिसकावून गुजरात टायटन्सकडून आणलेल्या हार्दिक पांड्याकडे सोपवले. हार्दिक हा भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदाचाही दावेदार मानला जात आहे.
असे असताना कर्णधार म्हणून केएल राहुलची चमकदार कामगिरी त्यांच्या आशा पल्लवित करण्यासाठी पुरेशी ठरेल. भारताकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्या फलंदाजीने प्रभावित करत 43 चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेत वनडे पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. वनडे पदार्पणात भारतीयाने खेळलेली ही संयुक्त तिसरी सर्वोच्च खेळी आहे. त्याने श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 73 चेंडूत 88 धावांची भागीदारी केली. अय्यरने 45 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना एकदिवसीय इतिहासातील चेंडूंच्या बाबतीत सर्वात लहान सामना ठरला. या सामन्यात एकूण 265 चेंडू टाकण्यात आले. भारताकडून 27.3 षटके आणि दक्षिण आफ्रिकेसाठी 16.4 षटके टाकण्यात आली.