विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या ५ वनडे मॅचच्या सीरिजपैकी दुसऱ्या वनडेमध्येही विराटनं शतक केलं. पहिल्या वनडेत विराटनं १४० रनची तर दुसऱ्या वनडेत नाबाद १५७ रनची खेळी केली होती. विराटच्या या शतकामुळे भारतानं ५० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून ३२१ रन केले.
विराट कोहली वनडेमध्ये सर्वात जलद १० हजार रन करणारा खेळाडू बनला आहे. विराटनं २०५ इनिंगमध्ये १० हजार रनचा टप्पा गाठला. याआधी हे रेकॉर्ड सचिनच्या नावावर होतं. सचिननं २००१ साली २५९व्या इनिंगमध्ये १० हजार रन पूर्ण केले होते.
कोहली आणि रायुडूनं तिसऱ्या विकेटसाठी १४२ बॉलमध्ये १३९ रनची पार्टनरशीप केली. कोहलीनं १० हजार रन पूर्ण केल्यानंतर बॅट उंचावून दाखवली. प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. मार्लोन सॅम्युअल्सच्या बॉलिंगवर फोर मारून विराटनं वनडेतलं त्याचं ३७वं शतक केलं.
विराटचं या सीरिजमधलं हे लागोपाठ दुसरं शतक आहे. लागोपाठ २ शतकं करण्याचं रेकॉर्ड विराटनं सातव्यांदा केलं आहे. अशाप्रकारे विराटनं १४ शतकं केली आहे. याआधी राहुल द्रविडनं लागोपाठ २ शतकं ६ वेळा म्हणजेच १२ शतकं केली होती.
विराटचं वनडेतलं वेस्ट इंडिजविरुद्धचं हे लागोपाठ तिसरं शतक आहे. असं करणारा विराट जगातला दहावा बॅट्समन आहे. हे रेकॉर्ड दोन वेळा करणारा तो एकमेव बॅट्समन आहे. याआधी विराटनं श्रीलंकेविरुद्ध लागोपाठ ३ वनडेमध्ये शतकं केली होती.
या शतकासोबतच विराट वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू बनला आहे. विराटनं दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्ज, हाशीम आमला आणि एबी डिव्हिलियर्सला मागे टाकलं आहे. या तिघांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ५-५ शतकं केली होती.
विराटचं विशाखापट्टणमच्या मैदानातलं हे तिसरं शतक आहे. विशाखापट्टणममध्ये विराटनं ५ इनिंग खेळल्या आहेत. विराटनं कोलंबोमध्ये ८ इनिंगमध्ये ३ शतकं आणि मीरपूरमध्ये १३ इनिंगमध्ये ४ शतकं केली आहेत.
२०१८ साली विराटनं वनडेत १ हजार रन पूर्ण केलेत. १ हजार रन करायला विराटला ११ इनिंग लागल्या. हेदेखील एक रेकॉर्ड आहे.
विराटनं चौथ्यांदा वनडेमध्ये १५० पेक्षा जास्त रन केले आहेत. विराट आता जयसूर्या, क्रिस गेल आणि हाशीम आमलासोबत आहे. सचिन तेंडुलकर, डेव्हिड वॉर्नरनं ५ वेळा आणि रोहित शर्मानं सर्वाधिक ६ वेळा १५० पेक्षा जास्त रन केले आहेत.