IndvsNz:हार्दिक पांड्याच्या नावे लाजिरवाणा विक्रम

हार्दिकने न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १३१ धावा देत केवळ ३ विकेट मिळवल्या.

Updated: Feb 11, 2019, 04:00 PM IST
IndvsNz:हार्दिक पांड्याच्या नावे लाजिरवाणा विक्रम title=

हॅमील्टन : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ४ धावांनी पराभव झाला. या सामन्यात भारतानं चांगली फलंदाजी केली असली, तरी न्यूझीलंडचं आव्हान भारताला गाठता आलं नाही. गोलंदाजीमध्ये भारताला संघर्ष करावा लागला. 

या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. हार्दिक पांड्याला तिसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना विशेष कामगिरी करता आली नाही. हार्दिकच्या गोलंदाजीवर विजय शंकर आणि खलील अहमदने कॅच सोडले, त्यामुळे पांड्याला एकही विकेट मिळाली नाही. तसंच त्यानं या सामन्यात ४ ओव्हरमध्ये ४४ धावा दिल्या. यासोबत त्याच्या नावे एक विक्रमाची नोंद झाली.  

सर्वाधिक धावा देण्याच्या बाबतीत कृणाल पांड्यादेखील मागे राहीला नाही. कृणालने ४ ओव्हरमध्ये ५४ धावा दिल्या. यामुळे तो तिसऱ्या टी-२० सामन्यात सर्वाधिक धावांची खैरात करणारा गोलंदाज ठरला. पांड्या बंधूंनी या मॅचमध्ये एकूण ९८ धावांची खैरात केली. विशेष म्हणजे या दोघांना एकही विकेट मिळाली नाही. 

हार्दिकने न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १३१ धावा देत केवळ ३ विकेट मिळवल्या. एका टी-२० सीरिजमध्ये भारतीय बॉलरनं दिलेल्या या सर्वाधिक रन आहेत. हार्दिकनं याबाबतीत त्याचा भाऊ कृणाल पांड्याला मागे टाकलं. या मालिकेमध्ये कृणाल पांड्यानं ११९ धावा लुटल्या. तर खलील अहमदनं या सीरिजमध्ये १२२ धावा दिल्या. या यादीत खलील अहमद दुसऱ्या क्रमांकावर आहे.