भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

भारतीय महिला टीमचा दमदार विजय

Updated: Aug 26, 2018, 01:26 PM IST
भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक title=

नवी दिल्ली : 18 व्या आशियाई स्पर्धेच्या महिला हॉकी स्पर्धेच्या चौथ्या क्वॉर्टरमध्ये तीन मिनिटात केलेल्या 3 गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी टीमने शनिवारी चॅम्पियन दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभूत करत सेमिफायनलमध्ये धडक दिली आहे. भारतीय टीमचा हा लागोपाठ तिसरा विजय आहे. नवनीत कौरने 16व्या, गुरजीत कौरने 54व्या आणि 55व्या मिनिटाला तर वंदना कटारियाने 56व्या मिनिटाला गोल केला.

यूरिमने 21व्या मिनिटाला दक्षिण कोरियाकडून एकमेव गोल केला. हा गोल पेनल्टी स्ट्रोकमध्ये झाला. भारतासाठी हा कठीण सामना होता. यामुळे भारतीय महिला खेळाडूंनी सावध सुरुवात केली. कोरियाची टीम देखील संयमाने खेळ करत होती. पहिलं क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. त्यानंतर दोन्ही संघान आक्रमक खेळी केली. 

भारताने दूसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला पहिला गोल केला. पण 4 मिनिटानंतर लगेचच पेनल्टी स्ट्रोकवर करत कोरियाने बरोबरी केली. तीसरे क्वार्टरमध्ये दोघंही संघ गोल नाही करु शकली. त्यामुळे 1-1 नेच सामना ड्रॉ होईल असं वाटत होतं. पण चौथ्य़ा क्वार्टरमध्ये शेवटच्या मिनिटांमध्ये भारताने दोन पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत सामना आपल्या बाजून ओढून आणला.

जगात 9 व्या स्थानी असलेल्या भारताने 3-1 ने आघाडी घेतल्यानंतर एक मिनिटानंतर आणखी एक गोल झाला आणि भारताने 4-1 ने सामना जिंकला. भारताने पहिल्या सामन्यामध्ये इंडोनेशियाला 8-0 ने आणि कजाकिस्तानला रेकार्ड 21-0 ने पराभूत केलं. भारतीय टीम पूल-बीमध्ये शेवटचा सामना सोमवारी थायलंड विरोधात खेळणार आहे.