IPL Mega Auction 2022 : मार्च आणि एप्रिलमध्ये खेळल्या जाणार्या इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामासाठीचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू इथं होणार आहे. या लिलावात 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यात 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. याआधी सर्व 10 संघांनी कायम ठेवण्याऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहेत.
कुठे होणार मेगा ऑक्शन
आयपीएल मेगा ऑक्शन बंगळुरू इथं होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सद्वारे केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून या सोहळयाला सुरुवात होईल.
कशी होणार ऑक्शनची सुरुवात
लिलावाची सुरुवात प्रमुख खेळाडूंवर बोली लावून होईल. या यादीत श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, क्विंटन डी कॉक, मोहम्मद शमी, कागिसो रबाडा, शिखर धवन, फाफ डू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये असून फ्रँचाईजी या सर्व खेळाडूंवर मोठी रक्कम खर्च करू शकतात.
पहिल्या दिवशी किती खेळाडूंचं ऑक्शन
ऑक्शनच्या पहिल्या दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी 161 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. उर्वरित खेळाडूंचा लिलाव १३ फेब्रुवारीला होणार आहे. फ्रँचाईजी पहिल्या दिवशी मोठ्या नावांवर बोली लावतील. या लिलावात प्रमुख खेळाडूंशिवाय इतर अनेक खेळाडूंना मोठी रक्कम मिळू शकते.
आयपीएलच्या 15व्या हंगामात दोन नवे संघही मैदानात उतरणार आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सच्या प्रवेशानंतर, गव्हर्निंग कौन्सिलने या मेगा लिलावात राईट टू मॅच कार्डचा समावेश केलेला नाही. या कार्डामुळे नवीन संघांना मोठा फटका बसू शकला असता.