२५ वर्षांनंतर 'रणजी'कार वसिम जाफरचा क्रिकेटला अलविदा

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा 

Updated: Mar 7, 2020, 05:01 PM IST
२५ वर्षांनंतर 'रणजी'कार वसिम जाफरचा क्रिकेटला अलविदा title=
वसिम जाफर

मुंबई : क्रिकेटपटू Wasim Jaffer वसिम जाफर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे असणाऱ्या ४२ वर्षी वसिमची निवृत्ती क्रीडा वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 
१९९६/९७ या वर्षात मुंबईच्या संघातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या वसिमने २०१५-१६च्या सुमारास विदर्भच्या संघातून खेळण्यास सुरुवात केली. मागील वर्षी रणजीच्या हंगामात त्याने सर्वोत्तम प्रदर्शन करत १०३७ धावा झळकावल्या होत्या. 

'फर्स्ट क्लास' अर्थात प्रशम श्रेणी क्रिकेटमध्ये तो २६० सामने खेळला. ज्यामध्ये ५०.६७च्या सरासरीने त्याने १९,४१० धावांचा डोंगर रचला. सर्वाधिक धावांच्या बाबबतीच त्याने केलेली सर्वोत्तम खेळी म्हणजे ३१४ धावांची. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने ५७ शकतं आणि ९१ अर्धशतकं केली आहेत. फेब्रुवारी २०२०मध्ये केरळच्या संघाविरोधात खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यातही जाफरने ५७ धावा करत त्याच्या कारकिर्दीतील ९१वं अर्धशतक झळकावलं होतं. 

सलामीवीर म्हणून त्याने भारतीय संघासोबत ३० सामने खेळले आहेत. २००० ते २००८ या वर्षांमध्ये तो संघातील सलमीवीर म्हणून समोर आला. या कारकिर्दीत त्याने १९४४ धावा केल्या. ज्यामध्ये पाच शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. २००६मध्ये वेस्ट इंडिज या संघाविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने २१२ धावांची द्विशतकी खेळी खेळली होती. भारतीय संघासाठी तो दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळला.

निवृत्तीच्या वेळी जाफर काय म्हणला? 

सर्वप्रथम हा खेळ खेळण्याची संधी दिल्याबद्दल मी अल्ल्हाचे आभार मानतो. याशिवाय मी माझ्या कुटुंबाचेही आभार मानू इच्छितो. ज्यामध्ये माझे आई-बाबा, भावाचाही समावेश आहे ज्यांनी मला या खेळात नेहमीच प्रेरणा दिली. शिवाय इंग्लंडमधील सुरेख आयुष्य सोडून इथे माझ्यासाठी, कुटुंबासाठी आणि मुलांसाठी आलेल्या माझ्या पत्नीचेही मी आभार मानतो, असं वसिम म्हणाला. 

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

प्रशिक्षकांपासून निवड समितीतील सदस्यांपर्यंत प्रत्येकानेच आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाप्रती त्याने कृतज्ञता व्यक्त केली. संघातील प्रत्येक कर्णधार आणइ खेळाडूचे आभार मानत त्याने आपल्याला आयुष्यभरासाठी मिळालेल्या या बहुमुल्य आठवणींप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.