काश्मीर मुद्द्यावर बरळणाऱ्या आफ्रिदीची 'गंभीर' कानउघडणी

राज्यसभेत जम्मू- काश्मीर मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. 

Updated: Aug 6, 2019, 01:29 PM IST
काश्मीर मुद्द्यावर बरळणाऱ्या आफ्रिदीची 'गंभीर' कानउघडणी  title=

मुंबई : राज्यसभेत जम्मू- काश्मीर मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. संबंधित राज्यात लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द करण्याविषयीच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर जगभरातून अनेकांच्याच प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यामध्ये शेजारी राष्ट्र अर्थातच पाकिस्तानमधील काही सेलिब्रिटींचाही समावेश होता. 

पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी यानेही ट्विटरच्या माध्यमातून त्याची प्रतिक्रिया दिली. 'संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आलेले हक्क काश्मीरच्या जनतेला देण्यात यावेत, असं म्हणत संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती का करण्यात आली आहे, ते झोपले आहेत का?' असा प्रश्न त्याने उपस्थित केला. काश्मीरमध्ये मानवतेच्या विरोधात जाऊन गुन्हे घडत असल्याचं म्हणच याची दखल घेतली गेलीच पाहिजे, असंही त्याने ट्विट करत म्हटलं. 

आफ्रिदीच्या या ट्विटची चर्चा रंगताच क्रिकेटपटू आणि लोकसभेत पूर्व दिल्लीच्या मतदार संघाचं खासदारपद भूषवणाऱ्या गौतम गंभीर याने आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

'आक्रमकता, मानवतेविरोधी गुन्हे घडत आहेत. हे खरंच आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आफ्रिदीची प्रशंसाच केली पाहिजे', असं उपरोधिक ट्विट करत गंभीरने त्याच्यावर निशाणा साधला. 'इथे तो एक गोष्ट नमूद करणं विसरला की, या सर्व गोष्टी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडत आहेत..... बरं... काही हरकत नाही... त्यावरही तोडगा निघेल', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. गौतम गंभीरचं हे ट्विट पाहता बेजबाबदारपणे वक्तव्य करत आपलं मत मांडणाऱ्या आफ्रिदीची खऱ्या अर्थाने गंभार कानउघडणी केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.