पोलिसांशी हुज्जत; रवींद्र जाडेजाची पत्नी वादाच्या भोवऱ्यात

वाचा सविस्तर वृत्त... 

Updated: Aug 11, 2020, 05:07 PM IST
पोलिसांशी हुज्जत; रवींद्र जाडेजाची पत्नी वादाच्या भोवऱ्यात  title=
संग्रहित छायाचित्र

राजकोट : coronavirus कोरोना व्हायरसचा देशात वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाकडून इतकंच नव्हे, तर थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून काही महत्त्वाचे नियम आखून दिले आहेत. ज्या नियमांचं पालन गेल्या कित्येक महिन्यांपासून जगभरातील असंख्य नागरिक करत आहेत. कोरोनापासून दूर राहण्यासाठीचे हे नियम नागरिकांच्याच हितासाठी आहेत. पण, याच नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर म्हणून नावाजलेला रवींद्र जाडेजा याची पत्नी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

जाडेजाच्या पत्नीनं तोंडावर मास्क न लावण्याचं कारण विचारताच पोलिसांशी हुज्जत घातल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी रात्री ही घटना घडल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स'नं प्रसिद्ध केलं असून, त्यावेळी जाडेजा कार चालवत होता. त्यावेळी त्यानं मास्क लावला होता. पण, त्याची पत्नी रिवा हिनं मात्र मास्क लावला नव्हता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

उप पोलीस आयुक्त मनोहरसिंह जाडेजा यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार हेड कॉन्स्टेबल सोनल गोसाई यांनी  किसानपाडा चौक या भागात पोहोचताच जाडेजाच्या पत्नीनं मास्क न लावल्याचं पाहिलं. त्यावेळी त्यांनी कार थांबवली. तेव्हाच जाडेजाच्या पत्नीनं पोलिसांशीच हुज्जत घातली. या प्रकरणाची बरीच चर्रा होऊ लागल्याचं पाहता सध्या त्यासंबंधीची चौकशी सुरु असून प्राथमिक स्तरावर हे शाब्दिक बाचाबाचीचं प्रकरण असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. 

दरम्यान, जाडेजाच्या पत्नीशी वाद झाल्यानंतर गोसाई यांची प्रकृती खालावली होती. परिणामी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून रजाही देण्यात आली. दरम्यान, सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारची एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.