भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतली लस, इशांत शर्माने घेतला पहिला डोस

इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंचे लसीकरण

Updated: May 10, 2021, 02:43 PM IST
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतली लस, इशांत शर्माने घेतला पहिला डोस title=

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांनी सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोहलीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, लवकरात लवकर लस घ्या. सुरक्षित रहा. तसेच ईशांत शर्मा आणि त्याची पत्नी यांनी देखील लसीकरण केंद्रा बाहेरचा सेल्फी अपलोड केला. इशांतने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, 'मी याबद्दल आभारी आहे, सुविधा आणि व्यवस्थापन सुरळीत चालू आहे हे पाहून आनंद झाला. सर्वांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण करा.'

यापूर्वी कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवन यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. भारतीय संघ दोन जून रोजी साडेतीन महिने इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. येथे संघ सहा कसोटी सामने खेळणार आहे. यात न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा समावेश आहे. शुक्रवारी बीसीसीआयने या दौऱ्यासाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी खेळाडूंचे लसीकरण

बीसीसीआयला आशा आहे की, इंग्लंड दौर्‍यावर जाणाऱ्या खेळाडूंना लसीचा पहिला डोस मिळेल. आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झालेल्या प्रसिद्ध कृष्णाला इंग्लंडला जाण्यापूर्वी ही लस घेणे कठीण होईल. याबाबत बीसीसीआयच्या एका सूत्राने म्हटले आहे की कोविड -१९ मधून बरे झाल्यानंतर काही कालावधीनंतरच लसीकरण करता येईल. जरी 18 किंवा 20 मे रोजी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरीही लसच्या पहिल्या डोससाठी त्यांना चार आठवडे थांबावे लागेल. जर सर्व खेळाडूंना कोविशिल्टची लस भारतात मिळाली तर इंग्लंडमध्ये त्याचे दुसरे डोस घेणे सोपे होईल, कारण ही ऑक्सफोर्डची लस आहे.