IPL मध्ये पर्पल कॅप जिंकणारे भारतीय गोलंदाज

आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप दिली जाते.

Updated: Sep 7, 2020, 10:59 AM IST
IPL मध्ये पर्पल कॅप जिंकणारे भारतीय गोलंदाज title=

मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आहे. जगभरातील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येतं. आयपीएलमध्ये खेळाडूंना केवळ पैसे कमावण्याची उत्तम संधी नसते तर जगातील अव्वल खेळाडूंसोबत संघात खेळण्याची संधीही मिळते. याखेरीज देशातील अनेक युवा खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची आणि आपलं कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. गोलंदाज असो की फलंदाज, आज भारताकडे पर्यायांचा अभाव नाही. आयपीएलने भारताला अनेक चांगले खेळाडू दिले आहेत.

1. भुवनेश्वर कुमार

भारतीय संघाचा स्टार खेळाडू भुवनेश्वर कुमारने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असताना पर्पल कॅप जिंकली होती. या मोसमात 17 सामन्यांत त्याने 23 विकेट घेतले होते. त्यानंतर पुढल्या वर्षी त्याने 14 सामने खेळून 14 विकेट घेत पुन्हा पर्पल कॅप जिंकली होती. हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने सलग दोन वर्षे आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकली आहे. ड्वेन ब्राव्होनेही दोनदा पर्पल कॅप जिंकली. पण ती सलग दोन वर्षात जिंकली नव्हती.

2. मोहित शर्मा

2014 साली IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना मोहित शर्माने पर्पल कॅप जिंकली होती. या मोसमात त्याने 16 सामने खेळत 23 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर त्याला 2015 च्या वर्ल्डकपमध्ये देखील संधी मिळाली होती.

3. प्रज्ञान ओझा

आयपीएल २०१० मध्ये डेक्कन चार्जेसकडून खेळताना, प्रज्ञान ओझाने पर्पल कॅप जिंकली. त्याने 16 सामन्यात 21 विकेट घेतल्या होत्या.

4. आर.पी सिंह

आयपीएल 2009 मध्ये आर.पी सिंहने पर्पल कॅप जिंकली होती. डेक्कन चार्जेसकडून खेळताने आर.पी सिंहने 16 सामन्यात 23 विकेट घेतल्या होत्या. आर.पी सिंह पर्पल कॅप जिंकणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे.