विराटचं शतक! पहिल्या वनडेत भारताचा दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्सनं दणदणीत विजय झाला आहे.

Updated: Feb 2, 2018, 12:03 AM IST
विराटचं शतक! पहिल्या वनडेत भारताचा दणदणीत विजय title=

डरबन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्सनं दणदणीत विजय झाला आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विराट कोहलीनं शतक झळकवलं. विराटचं कारकिर्दीमधलं हे ३३वं शतक होतं. तर अजिंक्य रहाणेनंही त्याला चांगली साथ दिली. रहाणेनं ८६ बॉल्समध्ये ७९ रन्सची खेळी केली. रहाणेच्या या खेळीमध्ये ५ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहलीनं ११९ बॉल्समध्ये ११२ रन्स केल्या. विराटच्या या खेळीमध्ये १० फोरचा समावेश होता. 

दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २७० रन्सचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या रुपात दोन धक्के लागले. रोहित शर्मा २० रन्सवर तर शिखर धवन ३५ रन्सवर आऊट झाला. मॉर्नी मॉर्कलनं रोहितची विकेट घेतली तर शिखर धवन रन आऊट झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचं शतक

कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं लगावलेल्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या वनडेमध्ये सावरलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं ५० ओव्हर्समध्ये २६९/८ एवढा स्कोअर केला. डुप्लेसिसनं ११२ बॉल्समध्ये १२० रन्स केल्या. डुप्लेसिसच्या या खेळीमध्ये ११ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच धक्के लागले. पण डुप्लेसिसनं पहिले क्विटन डीकॉक(३४), क्रिस मॉरिस(३७) आणि पेहलुक्वायोच्या मदतीनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. एकवेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था १३४-५ अशी होती. भारताकडून कुलदीप यादवनं ३, युझवेंद्र चहलनं २ आणि बुमराह-भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.