भारताने वेस्ट इंडिजच्या बॉलरना लोळवलं, रोहित-राहुलचं शतक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॅट्समननी तडाखेबाज खेळी केली आहे. 

Updated: Dec 18, 2019, 05:29 PM IST
भारताने वेस्ट इंडिजच्या बॉलरना लोळवलं, रोहित-राहुलचं शतक title=

विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॅट्समननी तडाखेबाज खेळी केली आहे. ५० ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर ३८७/५ एवढा झाला आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. रोहित आणि राहुल यांच्यात ओपनिंगसाठी २२७ रनची पार्टनरशीप झाली. रोहितने १३८ बॉलमध्ये १५९ रनची खेळी केली. यामध्ये १७ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. तर राहुल १०४ बॉलमध्ये १०२ रन करुन माघारी परतला. रोहितचं वनडे क्रिकेटमधलं हे २८वं तर राहुलचं तिसरं शतक होतं.

रोहित आणि राहुल यांच्यात मोठी पार्टनरशीप झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली पहिल्याच बॉलला आऊट झाला. पण नंतर भारतीय बॅट्समननी रनचा ओघ सुरुच ठेवला. श्रेयस अय्यरने ३२ बॉलमध्ये ५३ रन आणि ऋषभ पंतने १६ बॉलमध्ये ३९ रन केले. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी ४-४ सिक्स मारल्या. केदार जाधव १० बॉलमध्ये १६ रन करुन नाबाद राहिला.

१ मॅच ७ रेकॉर्ड! दीडशतकासोबतच रोहितचा विक्रमांचा पाऊस

पंत आणि अय्यर यांनी ४७व्या ओव्हरमध्ये रोस्टन चेसला तब्बल ३१ रन मारले. वनडे क्रिकेटच्या एका ओव्हरमधला भारताचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी १९९९ साली सचिन तेंडुलकर आणि अजय जडेजा यांनी न्यूझीलंडविरुद्ध हैदराबादमध्ये २८ रन आणि झहीर खान-अजित आगरकरने २००० साली झिम्बाब्वेविरुद्ध जोधपूरमध्ये २७ रन केले होते.

वेस्ट इंडिजकडून शेल्डन कॉट्रेलला सर्वाधिक २ विकेट मिळाल्या. तर किमो पॉल, अल्झारी जोसेफ आणि कायरन पोलार्डला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. याआधी चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये भारताला पराभवाचा धक्का लागला होता. वनडे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे.